शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (10:05 IST)

अमृतपाल सिंहला अटक, तब्बल 36 दिवसांपासून होता फरार

'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अखेर आज (23 एप्रिल) अटक केलीय. गेल्या तब्बल 36 दिवसांपासून अमृतपाल सिंह पंजाब पोलिसांना गुंगारा देत होता.
 
पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोगा जिल्ह्यातून अमृतपाल सिंह याला अटक करण्यात आली.
 
18 मार्च 2023 पासून म्हणजे गेल्या महिन्याभराहून अधिक काळापासून अमृतपाल सिंह पंजाब पोलिसांची नजर चुकवून पळत होता. त्याला जेरबंद करण्यासाठी पंजाब पोलिसांनी व्यापक स्तरावर अभियान सुरू केलं होतं. अखेर अमृतपाल पंजाब पोलिसांच्या हाती लागला आहे.
 
‘वारिस पंजाब दे’ संघटनेशी संबंधित लोकांवर चार गुन्हेगारी प्रकरणं आहेत. यात लोकांमध्ये वैमनस्य पसरवणं, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला आणि पोलीस कारवाईत अडथळे आणणे, यांचा समावेश आहे.
 
‘वारिस पंजाब दे’ संघटनेविरोधात अजनाला पोलीस ठाण्यावरील हल्ला करण्यासंदर्भातही गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यानंतर खरंतर अमृतपाल सिंहकडे अधिक गांभीर्यानं पाहण्यास सुरुवात झाली आणि त्याविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली.
पंजाब पोलिसांनी ट्वीट करून अमृतपाल सिंहच्या अटकेची माहिती दिलीय. तसंच, थोड्याच वेळात आणखी माहिती माध्यमांना दिली जाईल, असंही सांगितलंय.
 
यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलंय. कुठल्याही प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नये, असंही आवाहन पोलिसांनी केलंय.
अजनाला पोलीस ठाण्यावर काढला होता मोर्चा
'वारीस पंजाब दे' संघटनेच्या समर्थकांनी अमृतसरजवळील अजनाला येथील एका पोलीस स्टेशनवर फेब्रुवारी 2023 मध्ये मोर्चा काढला होता.
 
या संघटनेचे समर्थक बंदुका आणि तलवारी घेऊन आपल्या प्रमुखाला म्हणजेच अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग याची सुटका करायला गेले होते.
 
पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा पोलीस जखमी झाले होते.
 
यावेळी अमृतपाल सिंहही त्याच्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता.
अमृतपाल सिंहने यावेळी पोलिसांना 'अल्टीमेटम' देत, संघटनेच्या हजारो समर्थकांनी पोलिस स्टेशनमध्ये एवढा गोंधळ घातला होता की, पोलिसांना लवप्रीत सिंगच्या सुटकेचं आश्वासन द्यावं लागलं.
 
अमृतपाल सिंह आणि त्याच्या समर्थकांसमोर पोलीस हतबल झाल्याचं दिसून आले होते.
 
अमृतपाल म्हणाला की, "अमृतपाल हताश आहे, तो एकटा पडलाय असं काही वृत्तपत्रांत छापून आलंय... पण भक्तांनी मला कशापद्धतीने पाठिंबा दिलाय हे तुम्हाला दिसलंच असेल."
 
अमृतपाल सिंह नेमका आहे तरी कोण?
मागील काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अमृतपाल सिंहच्या नावाची चर्चा जोरावर आहे.
 
29 वर्षीय अमृतपाल सिंह खलिस्तान समर्थक असल्याचं म्हटलं जातं. मागच्या वर्षी ॲक्टर-ॲक्टिविस्ट असलेल्या दीप सिंह सिद्धूचं निधन झालं.
 
दीप सिंह सिद्धूने ह्यात असताना 'वारीस पंजाब दे' या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी अमृतपाल सिंगच्या खांद्यावर येऊन पडली. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी अमृतपाल सिंगला दुबईहून परतावं लागलं.
 
ॲक्टर-ॲक्टिविस्ट अशी ओळख असणारा दीप सिंग सिद्धू शेतकरी आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आला होता. पुढे रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाला.
मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अमृतपाल सिंग सांगतो की, अमृतसरच्या जादुखेडा गावात त्यांचं बालपण गेलं. 10 फेब्रुवारी 2023 मध्ये बाबा बकाला इथे त्याचा विवाह पार पडला.
 
गोपनीयतेचा मुद्दा पुढे करत त्याने आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल काहीही सांगणं टाळलं. शिवाय माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं टाळावं असंही पुढे सांगितलं.
 
अमृतपाल सिंहच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या शोधात त्याने अरबस्तान गाठलं.
 
आपला स्वभाव लोकांमध्ये मिसळण्याचा नसून मित्रमंडळी सुध्दा मर्यादित असल्याचं त्याने सांगितलं.
एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, दुबईतील मोठमोठ्या इमारती बघण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात. पण दुबईमध्ये राहत असताना देखील आपण या इमारती पाहायला कधी गेलोच नाही.
 
आपल्या शिक्षणाविषयी तो सांगतो की, शाळेत असताना त्याने त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्यानंतर तो दुबईला गेला.
 
तर दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्याने तीन वर्ष घालवली, पण आजही त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळालेली नाही.
 
'हत्या घडवून आणल्या, शिवाय त्याच्या बोलण्यावरही प्रतिबंध लावला'
 
अमृतपाल सिंग सांगतो की, "एक तर त्यांनी आमच्या हत्या घडवून आणल्या, आणि त्याच हत्याकांडावरील चर्चेवर प्रतिबंध लावलाय. लोकांना असं वाटतं की, आम्ही स्वतः या गोष्टी करत नाही तर कोणीतरी आमच्याकडून हे करवून घेत आहे."
 
आपल्या विरोधकांबाबत बोलताना अमृतपाल सिंग सांगतो की, "त्यांचा तर विरोध सुरूच आहे. काही लोक म्हणायचे की, दीप सिद्धूचं प्रस्थ संपवू, पण आज त्यांच्याकडे उत्तरं नाहीत "
 
अमृतपाल सिंग सांगतो की, जुन्या संघटना नवीन लोकांना, विशेषतः स्वतंत्र विचारांना स्थान देत नाहीत.
 
Published By- Priya Dixit