गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (19:58 IST)

अतीक अहमद : 5 वेळा आमदार, शंभरहून अधिक गुन्हे आणि आता जन्मठेप; कोण आहे हा नेता?

2005 साली बहुजन पक्षाचे नेते राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे मुख्य साक्षीदार होते उमेश पाल. याच उमेश यांची गेल्या महिन्यात भर दिवसा हत्या केली गेली.
 
याच उमेश पाल यांचं 17 वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. 2006 साली अतीक अहमद यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून आपलं अपहरण केलं असल्याचा आरोप उमेश पाल यांनी केला होता.
 
उमेश यांचं अपहरण, हत्या या गुन्ह्यात जे नाव समोर आलं त्या अतीक अहमद यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसारखे शंभरहून अधिक गुन्हे आहेत. सध्या गजाआड असलेले अतीक अहमद पाच वेळा आमदार आणि एकवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 
1989 पासून राजकारणात असलेले अतीक अहमद हे बसपा, सपा आणि अपना दल अशा तिन्ही पक्षांमध्ये होते.
 
गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेल्या अतीक अहमद यांची प्रतिमा बाहुबली नेता अशी होती आणि ते उमेश पाल प्रकरणाच्याही आधी या ना त्या कारणाने चर्चेत राहिले होते.
 
प्रयागराजमधल्या एमपी-एमएलए कोर्टाने उमेश पाल अपहरण प्रकरणात अतीक अहमदला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
अपहरणातील इतर सात आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली आहे.
 
मुळात हे उमेश पाल प्रकरण काय होतं? त्यात दोषी ठरलेले अतीक अहमद कोण आहेत? त्यांची कारकीर्द कशी होती?
 
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.
 
अतीक अहमद यांची सुरूवात
अतीक अहमद यांचा जन्म 1962 साली अलाहबादमध्ये (सध्याचं प्रयागराज) झाला होता.
 
अतीक अहमद यांचे वडील फिरोझ अहमद अलाहबादमध्ये टांगा चालवायचे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात अतीक यांनी जी माहिती दिली, त्यानुसार त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलंय.
 
माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, 1979 साली अतीक अहमद यांच्यावर पहिल्यांदा हत्येचा खटला दाखल झाला होता. त्यावेळी ते अल्पवयीन होते.
 
त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटले दाखल होतच राहिले.
 
1992 साली अलाहबाद पोलिसांनी अतीक अहमद यांच्या कथित गुन्ह्यांची यादीच जाहीर केली होती. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशव्यतिरिक्त बिहारमध्येही हत्या, अपहरण, खंडणीखोरीसारखे चाळीसहून अधिक खटले दाखल होते.
 
‘बाहुबली’ प्रतिमेच्या जोरावर राजकारणात यश
अतीक अहमदविरोधात सर्वाधिक खटले हे अलाहाबाद जिल्ह्यात दाखल केले गेले होते.
 
अत्यंत गंभीर आरोप असले तरी अतीक अहमद राजकारणात यशस्वी होत गेले. त्यांनी 1989 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
 
त्यांच्या या बाहुबली प्रतिमेमुळेच अलाहबाद शहर (पश्चिम) मतदारसंघातून अनेकदा निवडूनही आले.
 
अतीक अहमद एकदा अलाहबादमधल्या फूलपूर मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले. हा तोच मतदारसंघ आहे, ज्याचं प्रतिनिधीत्व कधीकाळी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं.
 
पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची जवळीक समाजवादी पक्षासोबत वाढली आणि अतीक अहमद यांनी सपामध्ये प्रवेश केला.
 
तीन वर्षं सपामध्ये राहिल्यानंतर अतीक 1996 मध्ये अपना दलसोबत गेले.
 
2002 साली अतीक अहमद यांनी अलाहबाद (पश्चिम) मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले.
 
आता त्यांना लोकसभेचे वेध लागले होते. म्हणून त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर 2004 साली फूलपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि निवडूनही आले.
 
उतरता काळ
आतापर्यंत सगळं ठीक चाललं होतं.
 
पण अतीक अहमद यांना सर्वांत मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या भावावर 2005 साली राजू पाल हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
 
2007 साली उत्तर प्रदेशची सत्ता बदलली आणि मायावती मुख्यमंत्री बनल्या. सत्ता गेल्यानंतर सपाने अतीक यांना पक्षातून बाहेर काढलं. दुसरीकडे, मायावतींनी अतीकला ‘मोस्ट वाँटेड’ घोषित केलं.
 
अतीक अहमदने 2008 साली आत्मसमर्पण केलं आणि 2012 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर 2014 साली अतीकने सपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
 
त्यानंतर अतीक अहमदना 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानंतर साबरमती जेलमध्ये पाठविण्यात आलं. त्याआधी ते उत्तर प्रदेशमधील नैनी तुरुंगात होते. अतीक यांच्यावर देवरियामधील एका व्यावसायिकाला तुरुंगात बोलावून धमकी देण्याचा आणि अपहरण करण्याचा खटला दाखल झाला होता.
 
अतीक अहमद यांच्या पत्नी शाइस्ता परवीन यासुद्धा राजकारणात आहेत. त्यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात बहुजन समाज पक्षात प्रवेश केला होता.
 
उमेश पाल प्रकरण काय होतं? अतीक अहमदचं नाव यात कसं आलं?
2005 मधील हत्येच्या एका घटनेतील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी 2023 ला दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.
 
प्रयागराज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर हत्येप्रकरणी माजी खासदार आणि बाहुबली नेता अतीक अहमद यांचा मुलगा असद, ‘बॉम्बबाज’ गुड्डू मुस्लिम, गुलाम आणि अरबाज यांचा हात असल्याचा दावा केला.
 
2005 साली बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर उमेश पाल यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांना राजू पाल हत्येप्रकरणी मुख्य आरोपी बनविण्यात आलेलं.
 
राजू पाल यांच्या पत्नी पूजा यांनी काही महिन्यांपूर्वी बीबीसीचे सहयोगी अमन द्विवेदी यांना सांगितलेलं की, जेव्हा 2006 साली राजू पाल हत्या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली, तेव्हा उमेश पाल यांनी आपला शब्द फिरवला.
 
पूजा पाल यांच्या मते जेव्हा राजू पाल हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपविला, तेव्हा सीबीआयने उमेश पालला साक्षीदार बनवलं नाही.
 
त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, उमेश पाल आपल्या मोठ्या भावाचा टँकर चालवायचे. 2005 साली ते पोलिसांच्या माध्यमातून राजू पाल प्रकरणी साक्षीदार बनले. पूजा पाल यांनी सांगितले की, राजू पाल यांना हॉस्पिटलमध्येही उमेश पालच घेऊन गेले होते.
 
पूजा पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश पाल 2006 पासून 2012 पर्यंत बसपामध्ये होते आणि त्यानंतर समाजवादी पक्षात सहभागी झाले.
 
2022 विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेश पाल भाजपमध्ये सहभागी झाली होते. त्यांना प्रयागराजमधल्या फाफामऊ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती.
 
राजू पाल हत्येनंतर उमेश पाल अतीक अहमद यांच्या निशाण्यावर आल्याचं पूजा पाल यांनी म्हटलं.
 
प्रॉपर्टीचे वाद आणि राजकारणामुळे उमेश पाल यांचं अनेक लोकांसोबत वैमनस्य होतं.
 
उमेश पाल यांच्या अपहरण प्रकरणी निर्णय
उमेश पाल यांनी 2007 मध्ये आरोप केलेला की, 28 फेब्रुवारी 2006 साली अतीक अहमदने त्यांचं अपहरण केलं होतं.
 
राजू पाल हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असल्याने त्यांनी आपल्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
उमेश पाल यांनी 2007 साली जी तक्रार दाखल केली होती, त्यामध्ये म्हटलं होतं की, “28 फेब्रुवारी 2006ला अतीक अहमद यांच्या लँड क्रूझरसह अजून एका वाहनानं त्यांचा रस्ता अडवला. त्या कारमधून दिनेश पासी, अन्सार बाबा आणि इतर काही लोक उतरले. त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली आणि मला कारमध्ये खेचलं. आत अतीक अहमद यांच्यासोबत तीन लोक रायफल घेऊनच बसले होते.
 
या लोकांनी मला मारहाण केली आणि चकिया इथल्या त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथे एका खोलीत कोंडून ठेवलं आणि पुन्हा मारहाण केली, वीजेचे शॉक दिले.”
 
राजू पाल हत्येप्रकरणी जबाब बदलण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही उमेश पाल यांनी केला.
 
आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलं, “अतीक अहमदने आपले वकील खान शौकत हनीफकडून एक कागद घेऊन मला दिला आणि सांगितलं की, हे पाठ कर. न्यायालयात तुला हेच सांगायचं आहे. नाही बोललास तर तुझे तुकडे करून कुत्र्यांना खायला घालू.
 
अतीक यांनी आपले लोक पाठवून माझ्या घरच्यांनाही त्याच रात्री धमकी दिली. पोलिसांकडे काही तक्रार केली, तर उमेशची हत्या करू असं त्यांनी धमकावलं. मला रात्रभर एका खोलीत बंद करून त्रास दिला. सकाळी 10 वाजता अतीक अहमद आणि त्यांचे साथीदार मला गाडीत बसवून घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की, रात्री जो कागद दिला होतो, तेच बोलायचं. नाहीतर घरी परत जाणार नाहीस.”
 
आपण उच्च न्यायालयाकडे सुरक्षा मागितलेली, पण त्यासाठी मला स्वतःलाच पैसे द्यायचे होते, असं उमेश पाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. सुरक्षेसाठी स्वतः पैसे द्यावेत अशी आपली आर्थिक परिस्थिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
उमेश पाल यांच्या तक्रारीनंतर बरोबर एक वर्षाने 5 जुलै 2007 साली अतीक, त्यांचे भाऊ अशरफ आणि चार अज्ञात व्यक्तिंविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
आता याच प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ अहमदला 28 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस त्यांना घेऊन अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमधून प्रयागराज इथे पोहोचले.
 
न्यायालयाने अतीक अहमदला उमेश पाल यांच्या अपहरणप्रकरणी दोषी ठरवलं आहे.
 
राजू पाल हत्याकांड
उत्तर प्रदेशमध्ये 2003 साली मुलायम सिंह यादव यांचं सरकार आलं. माध्यमांमधील रिपोर्टनुसार अतीक अहमद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
 
2004 साली लोकसभा निवडणुकीत ते समाजवादी पक्षाकडून खासदार बनले. त्यामुळे अलाहबाद (पश्चिम) विधानसभेची जागा रिकामी झाली.
 
2004 साली अतीकने आपला भाऊ खालिद अझीमने उर्फ अशरफला त्या जागेवरून मैदानात उतरवलं. मात्र ते बसपा उमेदवार राजू पाल यांच्याकडून चार हजार मतांनी पराभूत झाले.
 
राजू पाल यांच्यावर नंतर काही हल्ले करण्यात आले आणि राजू पाल यांनी त्यासाठी तत्कालीन खासदार अतीक यांना जबाबदार ठरवत आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं.
 
25 जानेवारी 2005 ला राजू पाल यांच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. त्यांना खूप गोळ्या लागल्या. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर राजू पालना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
 
या हत्याकांडामध्ये अतीक अहमद आणि अशरफ यांचं नाव समोर आलं.