मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (13:26 IST)

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट

bharat ratna to advani ji
माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
 
लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची बातमी देताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदन केलं आहे. आमच्या काळातील ते एक सर्वाधिक आदरणीय नेते आहेत, त्याचं भारताच्या विकासातलं योगदान मोठं आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. 1941 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक झाले. त्यांनी राजस्थानमध्ये संघाचे प्रचारक म्हणूनही काम केले.
 
1951 साली ते भारतीय जनसंघात सहभागी झाले. 1970 साली ते राज्यसभेत निवडले गेले.
 
1977 साली जनता पार्टीचे सरकार आल्यावर ते राज्यसभेचे सभागृह नेते झाले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री झाले.
 
1980 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर भाजपाच्या स्थापनेमध्ये ते महत्त्वाचे नेते होते. या पक्षाचे त्यांनी तीनवेळा अध्यक्षपद भूषवले.
 
1989 साली ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. 2014 पर्यंत ते सातवेळा लोकसभेत निवडून गेले.
 
पक्षासाठी योगदान
 
जनसंघ ते भाजप या प्रवासात आडवाणींइतकं योगदान कुणीही दिलेलं नाही, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. भाजपच्या दुसऱ्या पिढीतील म्हणजेच आज सत्ताधारी बाकांवर बसलेल्या 90 टक्के लोकांना त्याठिकाणी पोहोचवण्यात आडवाणींचं योगदान असल्याचं बोललं जातं.
 
1984 मध्ये भाजपच्या दारुण पराभवानंतर 1996 मध्ये सरकार स्थापन करण्यापर्यंतच्या प्रवासात आडवाणींचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही.
 
राममंदिर आंदोलनाच्या काळात देशातील सर्वात लोकप्रिय नेता असूनही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वरहस्त असतानाही आडवाणींनी 1995 मध्ये वाजपेयींना पंतप्रधानपदाचा दावेदार घोषित करून सर्वांना चकित केलं होतं. स्वत: पंतप्रधान होऊ शकत असतानाही, भाजपमध्ये वाजपेयींपेक्षा दुसरा मोठा नेता कुणीही नाही, असं अडवाणी म्हणाले होते. पन्नास वर्षे ते वाजपेयींसोबत दुस-या क्रमांकाचे नेते बनून राहिले.
 
पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात असूनही आडवाणींवर कोणताही आरोप नव्हता आणि 1996 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नरसिंह राव यांनी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना हवाला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आडवाणी यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला आणि या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं ते म्हणाले होते. 1996 च्या निवडणुकीनंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. अशा प्रकारचं धाडस दाखवणं प्रत्येकाला जमत नाही, असं तज्ज्ञ सांगतात.
 
पंतप्रधानपदासाठी वाजपेयींचं नाव जाहीर केलं तेव्हा....
1996 च्या निवडणुकीपूर्वी काही महिने आधी मुंबईमधल्या शिवाजी पार्कवर भारतीय जनता पक्षानं एका मोठ्या सभेचं आयोजन केलं होतं.
 
68 वर्षांचे लालकृष्ण आडवाणी जवळपास दशकभरापासून पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाला एक नवीन दिशा आणि ऊर्जा दिली होती.
 
अडवाणींपेक्षा दोन वर्षांनी मोठे असलेले वाजपेयी तेव्हा नेतृत्वाच्या शर्यतीत काहीसे मागे पडल्यासारखे वाटत होते. पक्षात त्यांना आदराचं स्थान होतं, मात्र जेव्हा पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असा प्रश्न उपस्थित व्हायचा, तेव्हा आडवाणी यांचं नाव आधी घेतलं जायचं.
 
मात्र शिवाजी पार्कवरच्या त्या भव्य सभेत आडवाणींनी पक्षाचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून वाजपेयींच्या नावाची घोषणा केली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.
 
22 मे 1996 ला 'आउटलुक' मासिकात छापून आलेल्या 'अ टेल ऑफ़ टू चीफ्स' या लेखात म्हटलं होतं, "एवढी महत्त्वाची घोषणा करण्यापूर्वी आपली परवानगी का घेतली नाही, असं वाजपेयींनी आडवाणींना विचारलं. आडवाणींनी त्यांना प्रतिप्रश्न केला की, जर मी तुम्हाला आधी विचारलं असतं, तर तुम्ही माझ्या प्रस्तावाला होकार दिला असता?
 
आडवाणी यांनी 'माय कंट्री माय लाइफ' या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे, "मी जे केलं तो कोणताही त्याग नव्हता. पक्ष आणि देशाच्या हितासाठी काय योग्य आहे, याचं एक तर्कनिष्ठ आकलन होतं."
 
वादग्रस्त विधान
4 जून 2005 हा आडवाणींच्या राजकीय जीवनातील आणखी एक महत्त्वाचा दिवस होता, कराचीतील जिना यांच्या समाधी स्थळावर त्यांच्या भाषणाची आठवण करून देताना आडवाणी म्हणाले होते की, जिना यांना धर्मनिरपेक्ष पाकिस्तान हवा होता. अडवाणींनी जिना यांना पाठिंबा दिल्याने मोठा गदारोळ माजला होता.
 
संघाचे सर्वात आवडते नेते असूनही आडवाणी यांना संघाच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागलेला. दिल्लीत काही नेत्यांनी त्यांना आपलं वक्तव्य बदलण्याचा सल्लाही दिला, परंतु आडवाणी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणं हे आडवाणींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं.
 
Published By- Priya Dixit