शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (16:03 IST)

चंबळ खोऱ्यातील डाकू राजकारणात का टिकू शकले नाहीत?

chambal daku
सलमान रावी
मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील कराहत येथून लहरोनी गावचं अंतर सुमारे 15 किलोमीटर असेल.
 
मुसळधार पावसामुळे हा रस्ता कापणं खूप अवघड झालं होतं. दुपारची वेळ होती, पण काळ्याभोर आभाळामुळे रात्रच असल्याचा भास होत होता.
 
रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरं होती. अखेर हा रस्ता पार करून आम्ही लहरोनीला पोहोचलो. रस्त्यात काही मजूर एका घराखाली बसलेले होते.
 
आम्ही त्यांना गावच्या प्रमुखाच्या घराचा पत्ता विचारला. त्यानंतर एक व्यक्ती रस्ता दाखवण्यासाठी आमच्या सोबत येऊ लागला. त्याने लांबून इशारा करून आम्हाला म्हटलं, “हे प्रमुखाचं शेत आहे.”
 
लहरोनीच्या प्रमुखांसोबत आमची ही पहिलीच भेट होती. एका पत्र्याच्या शेडखाली पलंग टाकून 75 वर्षांचे प्रमुख पांढऱ्या पोशाखात बसलेले होते. ते आपल्या मिशांना ताव देत मजेत बसलेले होते. आम्ही येत असल्याची त्यांना पूर्वकल्पना होती.
 
पूर्वी ते डाकू म्हणून चंबळच्या खोऱ्यात आणि श्योपूरच्या जंगलात राहत असतानाही एखादा पत्रकार भेटायला येत असल्याची त्यांना पूर्वकल्पना दिली जायची. आजही हे बदललेलं नव्हतं.
 
पण त्यांचा पोशाख मात्र आता बदलला होता. त्यावेळी ते खाकी कपडे परिधान करायचे. लांबसडक केस होते, हातात बंदूक धरलेली असायची.
 
पण आता त्यांचं वय झाल्याचं दिसून येतं. आताही ते बंदूक वापरतात. पण ती स्वयं संरक्षणासाठी वापरतो, असं ते सांगतात. ते म्हणतात, “याची आवश्यकता मला आहे, कारण खूप जणांचं शत्रूत्व आहे.”
 
रमेश सिकरवार यांचं नाव चंबळमध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या शेवटच्या डाकूंच्या यादीत येतं. त्यांनी ऐंशीच्या दशकात आत्मसमर्पण केलं होतं. त्यावेळी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या सांगण्यावरून 27 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी शस्त्र खाली ठेवले होते.
 
रमेश सिकरवार यांच्यासह त्यांच्या गँगमधील 32 सदस्यांनीही त्यावेळी आत्मसमर्पण केलं होतं. पुढे 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी आपलं नवं आयुष्य सुरू केलं होतं.
 
मध्य प्रदेशातील चंबळ खोरे परिसर हे कित्येक वर्षे डाकूंचा बालेकिल्ला राहिलेला होता. नंतरच्या काळात विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आणि गांधीवादी नेते सुब्बा राव यांच्या प्रयत्नांमुळे 654 पेक्षा जास्त डाकूंनी आत्मसमर्पण केलं.
 
डाकूंचा उदय आणि अस्ताची कहाणी
डाकूंच्या आत्मसमर्पणाचं सत्र 1960 ते 1980 च्या दशकापर्यंत सुरू होतं. यादरम्यान सुमारे 1 हजार डाकूंनी आत्मसमर्पण केलं. त्यानंतरच चंबळ खोरे हे डाकूंच्या दहशतीपासून मुक्त होऊ शकलं.
 
पूर्वीच्या काळी डाकू म्हणून काम करणाऱ्या अनेकांनी शिक्षा भोगून नंतरच्या काळात सर्वसामान्य आयुष्य सुरू केलं होतं. अनेकांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावून पाहिलं. काहींनी तर निवडणुकाही लढवल्या.
 
पण मध्य प्रदेशच्या राजकारणात हे डाकू इतके यशस्वी ठरले नाहीत. मात्र, अजूनही या डाकूंचा प्रभाव समाजातील एका मोठ्या गटावर असल्याचं दिसून येतं.
 
यापैकीच एक आहेत 80 वर्षीय मलखान सिंह. नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
 
गुनासह मुरैना आणि चंबळ परिसरात त्यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो.
 
रमेश सिकरवार यांची प्रतिमा आजही चंबळ परिसरात रॉबिनहूड प्रमाणे आहे.
 
60 च्या दशकात मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यात अनेक निर्दयी डाकूंचं वर्चस्व होतं. हिंसाचार, हत्या, अपहरण आणि खंडणी वसुली यांच्यासारख्या घटनांमुळे चंबळ खोरे देशभरात बदनाम झालं.
 
यादरम्यान, एकापेक्षा एक क्रूर डाकूंनी चंबळ खोरे परिसरात आपलं बस्तान बसवलेलं होतं.
 
मध्य प्रदेशच्या गुन्हेगारी संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार, 1960 ते 1976 पर्यंत 654 डाकूंनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं.
 
यामध्ये बटेश्वर आणि राजस्थानातील धौलपूरशिवाय जिथे मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण झालं, त्या मुरैना जिल्ह्यातील जौरा गावात सुब्बा राव यांचं गांधी सेवाश्रम आहे.
 
आत्मसमर्पण करणाऱ्या डाकूंनी तुरुंगातील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर गांधी सेवाश्रमात राहून सामाजिक कार्य सुरू केलं.
 
डाकू आणि राजकारण
आत्मसमर्पण करणाऱ्या बहुतांश डाकूंनी शेती करण्यावर भर दिला. काहींनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
 
आत्मसमर्पण करणाऱ्या प्रेम सिंह यांचं 2013 साली निधन झालं. ते काँग्रेसच्या तिकिटावर सतना येथून आमदारही होते.
 
आणखी एक पूर्वाश्रमीचे कुख्यात डाकू मोहर सिंह यांनीसुद्धा राजकारणात जम बसवण्याचा प्रयत्न केला. 80 च्या दशकात त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. पुढे 90 च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
 
त्यानंतर, 1995 मध्ये ते भिंड जिल्ह्यातील महागाव नगरपालिकेचे अध्यक्षही बनले.
 
सिकरवार आपल्या जुन्या आठवणी सांगताना म्हणतात, “सरकारने माझ्यावर 3 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. तर, माझ्या इतर सदस्यांवर प्रत्येकी 50 हजार रुपयांचं बक्षीस होतं.”
 
ते म्हणतात, “खून करायचा आणि गँगमध्ये सामील व्हायचं. खून केल्याशिवाय आम्ही कोणत्याच व्यक्तीला गँगमध्ये सामील करून घ्यायचो नाही. आम्ही आत्मसमर्पण केलं, तेव्हा आमच्याशिवाय कोणतीच गँग मध्यप्रदेशात उरलेली नव्हती. 1982 पर्यंत सगळ्या गँगनी आत्मसमर्पण केलेलं होतं.”
 
रमेश सिकरवार यांचा सख्ख्या काकाशी वाद झाल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. जमिनीचा तो वाद होता. तर काकांनी रमेश यांच्या जमिनीवर कब्जा केलेला होता.
 
याविषयी माहिती देताना ते म्हणाले, “आमच्या काकांनी आमचा खूप छळ केला. पोलीस आणि प्रशासनानेही आम्हाला न्याय दिला नाही. आम्ही नातेवाईकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच आमचं ऐकलं नाही. सगळे पैसेवाल्या काकाच्या बाजूने उभे राहायचे.”
 
“कुठेच न्याय मिळाला नाही. तेव्हा वडिलांनी म्हटलं की नातेवाईक किंवा प्रशासन कुणीच आपलं ऐकणार नाही. या दुष्टांना तूच मारून टाक. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. त्यावेळी माझ्याकडे एक बंदूक होती. ती घेऊन मी पळून गेलो. एक वर्ष एकटाच राहिलो. त्यानंतर आम्ही काकाला गाठून त्याचा डाव संपवला.”
 
स्थानिकांचा अजूनही पाठिंबा
पोलिसांसोबत लपाछपीचा खेळ करत असलेल्या रमेश सिकरवार यांनी अखेरीस आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या आवाहनानंतर त्यांनी शस्त्र खाली ठेवण्याचं ठरवलं.
 
ते म्हणाले, “अर्जुन सिंह यांनी माझ्या वडिलांना पौरी येथे बोलावलं होतं. म्हणाले की तुमच्या मुलाला तुम्ही कसंही करून भेटायला सांगा. त्यानंतर पौरी येथे मी अर्जुन सिंह यांना एकटा भेटलो. त्यानंतर चार दिवसांनी सुब्बा राव आणि राजगोपाल आमच्याकडे आले. ते आमच्या गँगसोबत चार-पाच दिवस राहिले. ते म्हणाले, तुमच्या मुलांचं संगोपन आम्ही करू. तुम्हाला कोणतीच काळजी नाही. आम्ही त्यांचं बोलणं ऐकून घेतलं.”
 
सिकरवार यांनी आत्मसमर्पण केल्याच्या घटनेला आता 38 वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी राजकारणातही हात आजमावून पाहिला. पण त्यांच्या पूर्वी आत्मसमर्पण करणाऱ्या मलखान सिंह यांच्याप्रमाणेच रमेश सिकरवार यांनाही राजकारणात यश मिळालं नाही.
 
श्योपूरची जंगलं, चंबळ खोरे परिसरात राहूनही रमेश सिकरवार यांची प्रतिमा ही रॉबिनहूडसारखीच कायम राहिली. त्यांच्या मते, येथील आदिवासींमध्ये त्यांचा प्रभाव अजूनही तसाच आहे, जसा ते डाकू असताना होता.
 
ते पुढे सांगतात, “फरार असताना मी अनेक आदिवासी मुलींशी विवाह केला. त्यामुळे आदिवासी समाजाचा मला पाठिंबा आहे. या भागात आदिवासींची 60 हजार मतं आहेत. आम्ही सांगू त्यांना आदिवासी समाज मत देतो. कोणताही नेता आला तरी ते जुमानत नाहीत. प्रमुख जे म्हणतील, तेच आम्ही करू असं म्हणतात.”
 
लक्कू आदिवासी हे लहरोनी गावचे सरपंच आहेत. त्यांचा समाज गेली कित्येक वर्षांपासून सिकरवार यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर लोक त्यांना निवडणूक लढवण्याची विनंतीही करत असतात, पण सिकरवार निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत.
 
रमेश सिकरवार सध्या भाजपमध्ये आहेत. मुरैनाचे खासदार नरेंद्र सिंह तोमर यांच्या सांगण्यावरून आपण भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
 
2008 साली त्यांनी समाजवादी पक्षातर्फे विजयपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना केवळ 16 हजार मते मिळू शकली होती.
 
सिकरवार यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांचे नेते पाठिंब्याची विनंती घेऊन त्यांच्याकडे हजर होतात.
 
आता आपण राजकारणात जरूर आहोत. पण यामध्ये मन लागत नाही. बंदूकीपेक्षाही एखाद्या पक्षाचा झेंडा उचलणं अवघड आहे, असं ते म्हणतात.
 
त्यांच्या मते, सरकारमधील लोकांच्या तोऱ्यामुळेच अनेक डाकूंचा जन्म झालेला आहे. प्रामुख्याने पोलीस, तलाठी यांची कार्यपद्धत आणि भ्रष्टाचार यांना ते यासाठी जबाबदार मानतात.
 
लक्कू सांगतात, “आमच्या समाजाने नेहमी सिकरवार यांना विचारूनच मतदान केलं. पुढेही आम्ही असंच करत राहू.”
 
स्थानिक रहिवासी कसिया सहरिया यांनी याचं कारण सांगताना म्हटलं, “रमेश सिकरवार नसते, तर आदिवासींच्या जमिनींवर दबंग जमीनदार लोकांनी कब्जा केला असता. दबंग लोकांनी आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला असता सिकरवार मध्ये आल्याने त्यांची जमीन वाचली.”
 
एकता परिषदशी संबंधित दौलत राम गौड यांच्या मते केवळ आदिवासी समाजच नव्हे तर इतर वंचित घटकांमधील लोकही रमेश सिकरवार यांना खूप मानतात.
 
ते म्हणाले, “कोणताही व्यक्ती इतर एखाद्या व्यक्तीकडून पीडित असेल, तर तो ती तक्रार घेऊन प्रमुखांकडे जातो. यानंतर रमेश हे तत्काळ त्या व्यक्तीची तक्रार सोडवण्यासाठी निघतात.”
 
'डाकूंची वर्तणूक संविधानानुसार नाही'
पण अनेक लोक असे आहेत, ज्यांना डाकूंची प्रतिमा ‘रॉबिनहूड’सारखी बनवण्यावर आक्षेप आहे.
 
मध्य प्रदेश पोलिसाताली माजी IPS अधिकारी शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या मते, डाकूंची वर्तणूक ही संविधानानुसार योग्य नाही.
 
ते म्हणतात, “लोकशाहीत प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे. प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. पोलीस कायदा बनवण्याचं किंवा शिक्षा देण्याचं काम कधीच करत नाही. हे काम न्यायालयाचं आहे. आपल्याला संविधानानुसारच चालावं लागेल. कुणी कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम कधीच योग्य नसतील. त्यामुळे डाकूंचा गौरव करण्यात येऊ नये. न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम नाही.”
 
डाकूंच्या जीवनावर लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई म्हणतात, “जे डाकू शिक्षा भोगून सर्वसामान्य आयुष्य जगू लागले, ते पुढे एखाद्या राजकीय पक्षाचा आश्रय घून नेते बनले. पण त्यांची स्थिती राजकारणात नशीब आजमावणाऱ्या चित्रपट अभिनेत्यांप्रमाणेच बनली.”
 
ते म्हणतात, “राजकारणात आलेल्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांचंही काही चालू शकलं नाही. मोठे नेते आपल्याला हातचा राखून ठेवतात, हे त्यांच्या लक्षात आलं. डाकूंच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. सिकरवार आणि मलखान सिंह यांच्यासोबतही हेच घडलं. ते राजकारणात आले, पण त्यांना काळानुसार लक्षात आलं की ही कशा प्रकारची दलदल आहे.”
 
भिंडचे ज्येष्ठ पत्रकार रामभुवन सिंह कुशवाहा यांच्या मते, डाकू हे एखाद्या विशिष्ट कारणास्तव शस्त्र हाती घेतात. पण नंतर ते गरीबांसाठीच काम करतात. ते राजकारणात आले पण नेते लोकांचे गुण त्यांच्यात आले नाहीत. त्यामुळेच पुढे ते राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत.”
 
डाकूंनी नंतरच्या काळात राजकारणात करिश्मा दाखवला नाही. पण नेत्यांच्या पारड्यात ते भरभरून योगदान देऊ शकतात. कारण त्यांच्या समाजावर त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं आजवर दिसून आलं आहे.
 
अशा डाकूंमध्ये प्रमुख नाव आहे पानसिंह तोमर यांचं. त्यांची दहशत इतकी होती की त्यांचं नाव घेतलं तरी लोकांना घाम फुटायचा.
 
पानसिंह तोमर हे लष्करात जवान होते. चांगले धावपटूही होते. पण जमिनीच्या वादातूनच ते डाकू बनले.मोहर सिंह यांना चंबळचे सर्वात क्रूर डाकू म्हणून ओळखलं जात होतं. त्यांच्यावर 300 पेक्षा जास्त हत्या, लूट आणि अपहरण यांसारखे गुन्हे दाखल होते.
 
मोहर सिंह यांनी 1982 साली आत्मसमर्पण केलं होतं. पुढे त्यांनी काँग्रेस आणि भाजपचा प्रचारही केला. पण स्वतः मात्र कधीच निवडणूक लढले नाहीत.
 
पण त्यांच्या पाठिंब्याने उमेदवारांचा जय-पराजय निश्चित होत असे. दोन वर्षांपूर्वी मोहर सिंह यांचं निधन झालं.
 
रमेश सिकरवार यांच्याशिवाय जुन्या डाकूंमध्ये फक्त मलखान सिंह जिवंत आहेत. त्यांनी नुकतेच काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
 
मलखान सिंह यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवलेली आहे. ते काँग्रेससाठी ग्वालियर आणि चंबल परिसरात प्रचाराचं काम करत आहेत. त्यांनी 1996 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर भिंड येथून निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
 
अर्जुन सिंहांनी डाकूंचं आत्मसमर्पण कसं करून घेतलं
रशीद किडवाई यांनी आपल्या ‘लिडर्स, पॉलिटिशियन्स, सिटिझन्स’ या पुस्तकात आत्मसमर्पण करून राजकारणात आलेल्या डाकूंचा उल्लेख केला आहे.
 
त्यामध्ये फूलन देवी, मान सिंह, मोहर सिंह आदी प्रमुख नावे आहेत.
 
किडवाई म्हणतात, “मध्य प्रदेश आणि चंबळ खोऱ्याशी लागून उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील डाकूंची समस्या संपवण्यात तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांची भूमिका महत्त्वाची आहे. अर्जुन सिंह यांनी 1 हजारपेक्षा जास्त डाकूंना आत्मसमर्पण करण्यासाठी राजी केलं.”
 
ते म्हणतात, “त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक धोरण बनवलं. गांधीवादी नेत्यांना आपल्या सोबत घेतलं. अर्जुन सिंह नसते तर डाकूंची समस्या हाताबाहेर गेली असती. त्यांच्याच पुढाकाराने सुरुवातील हिंसाचार थांबला आणि नंतर एक एक करून डाकूंनी आत्मसमर्पण करणं सुरू केलं.”
 
“हे खूप मोठं पाऊल होतं. कारण ही समस्या पूर्णपणे संपली नसती, तर त्याची स्थिती आजच्या नक्षलवादासारखी असली असती.”
 
अर्जुन सिंह यांच्या पुढाकारामुळे डाकूंमध्ये सरकारी यंत्रणेवर विश्वास निर्माण झाला. त्याच कारणामुळे अनेक जण शस्त्र खाली ठेवण्यास तयार होऊ लागले.
 
फूलनदेवी यांचा प्रभाव उत्तर प्रदेशात जास्त होता. पण त्यांनीही मध्य प्रदेशात 13 फेब्रुवारी 1983 रोजी आत्मसमर्पण केलं.
 
त्यांच्या आत्मसमर्पणासाठी भिंडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेंद्र चतुर्वेदी यांनी आपल्या मुलाला डाकूंकडे गहाण स्वरुपात ठेवलं होतं.
 
सेवानिवृत्त IPS अधिकारी शैलेंद्र श्रीवास्तव म्हणतात, “उत्तर प्रदेशात दहशत माजवणारे डाकूही मध्य प्रदेश सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाकडे आकर्षिक झाले. त्यामुळे बहुतांश डाकूंनी मध्य प्रदेशातच आत्मसमर्पण करणं योग्य मानलं.”
 
फूलन देवी यांनी भिंडमधील MJS महाविद्यालयात आपल्या सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण केलं. त्यानंतर काही वर्षे त्या मध्य प्रदेशातच तुरुंगात होत्या. पुढे त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं.
 
1994 मध्ये फूलन देवी यांची सुटका झाली. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, 2001 साली दिल्लीत त्यांची हत्या झाली.
 
आता स्थिती काय?
चंबळ खोरे परिसर आता डाकूमुक्त आहे.
 
कधी-कधी एखाद्या ठिकाणी डाकूंची गँग सक्रिय असल्याच्या बातम्या पोलिसांना मिळत असतात. पण स्थानिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर पोलिसांना चंबळ खोऱ्यातील लहान-मोठ्या टेकड्यांच्या परिसरात टेहळणी करणं शक्य झालं आहे.
 
शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या मते, या परिसरातील डाकूंची समस्या आता मूळासकट नष्ट झालेली आहे.