1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 26 मे 2023 (13:34 IST)

चित्त्याची भारतात जन्मलेली 4 पैकी 3 पिले दगावली, चित्त्यांच्या या 'रहस्यमय' मृत्यूमागे काय कारणे आहेत?

गेल्या वर्षी आफ्रिकेतून भारतात आणलेले 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले होते. पण यापैकी काही चित्त्यांचा एकामागून एक मृत्यू होत असल्याने खळबळ माजली आहे.
सुरुवातीला आणलेल्या चित्यांपैकी काही चित्त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. आता या चित्त्यांनी जन्माला घातलेल्या 4 पिल्यांपैकी 3 पिले दगावल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
 
यासंदर्भात मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षकांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली.
 
त्यानुसार, "23 मे रोजी सकाळी ज्वाला नामक मादी चित्त्याने जन्माला घातलेल्या एका बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर 3 बछड्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं असता त्यापैकी इतर 2 बछड्यांचाही मृत्यू झाला आहे.
 
या चित्त्यांचा जन्म दोन महिन्यांपूर्वी झाला होता. पहिल्या बछड्याचा मृत्यू होताच मादी चित्ता ज्वाला हिलासुद्धा सप्लीमेंट फूड सुरू करण्यात आलं होतं. पण तरीही इतर 3 बछड्यांची प्रकृती नाजूक होती.
 
या भागात 23 मेे रोजी आजवरचं सर्वाधिक तापमान नोंंदवण्यात आलं होतं, हे विसरता कामा नये, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
 
सर्व चित्ते बछडे हे नाजूक होते. त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झालं होतं. मादी चित्ता ज्वाला ही पहिल्यांदाच आई बनली आहे. साधारणपणे चित्ते आठ आठवड्यांमध्ये चालू लागतात. हे चित्तेही गेल्या आठवड्यात चालू लागले होते.
 
चित्ता तज्ज्ञांच्या मते आफ्रिकेतही चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. यासंदर्भात स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षकांनी दिली.
 
पिरोजच्या मृत्यूपासून सुरुवात
28 फेब्रुवारी 2023 रोजी इराणमध्ये ‘पिरोज’ हे नाव ट्रेंड होत होतं. सोशल मिडीयावर लोक #RIPPirouz लिहून त्याला निरोप देत होते.
 
सगळे प्रयत्न करुनही पिरोजला वाचवण्यात यश आलं नाही. पिरोजची किडनी फेल झाली होती.
 
पिरोज 10 महिन्यांचा होण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक होते. पण त्याच्या किडनी फेल होत गेल्या. त्याला इराणच्या सेंट्रल वेटरिनरी हाॅस्पिटलमध्ये डायलेसिसवर ठेवलं होतं.
 
मागच्या वर्षी पिरोजच्या आईने बंदिस्त वातावरणातच तीन चित्त्यांना जन्म दिला होता. आपल्या तीन भावांमध्ये फक्त पिरोजच एकटा एवढा काळ जगू शकला.
 
विशेष म्हणजे एकेकाळी इराणमध्ये हजारोंच्या संख्येने चित्ते होते. पण आता चित्त्यांना परत आपल्याकडे वसवण्याचा इराणचा आणखी एक प्रयत्न असफल ठरला.
 
इराणमधल्या या घटनेच्या साधारणपणे महिनाभरानंतर 27 मार्च रोजी भारतातल्या एका चित्त्याचा मृत्यू झाला. कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या साशा नावाच्या चित्त्याचा किडनी फेल झाल्यामुळे मृत्यू झाला.
 
सप्टेंबर 2022 मध्ये आठ चित्ते नामिबियामधून कुनोतल्या राष्ट्रीय उद्यानात आणले होते. साशा त्यांच्यापैकीच एक होती.
 
साशावर उपचार करणाऱ्या मेडिकल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हापासून ती कुनो राष्ट्रीय उद्यानात आली होती, तेव्हापासूनच तिची तब्येत व्यवस्थित नव्हती. कदाचित नामिबियातच तिला किडनी इंफेक्शन झालं होतं. यामुळे तिला ‘बोमा’ या क्वारंटाईन असलेल्या क्षेत्रातच जास्त प्रमाणात ठेवलं होतं.”
 
आता परत एका चित्त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे हा प्रश्न उद्भवतो की या चित्त्यांच्या मृत्यूमागे कारणं काय आहेत.
 
आधी नामिबिया आणि मग दक्षिण आफ्रिकेतून आणले चित्ते
रविवारी, 22 एप्रिल 2023 रोजी कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात उदय नावाच्या चित्त्याचा अतिशय रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला.
 
नामिबियामधून आठ चित्ते आणल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनोमध्ये आणले होते. सहा वर्षांचा उदय त्यांच्यापैकी एक होता.
 
 
मध्य प्रदेशचे प्रमुख वाईल्डलाईफ वाॅर्डन जेएस चौहान यांनी सांगितलं की, “चित्त्यांची आम्ही दररोज तपासणी करतो. शनिवारी उदय पूर्णपणे बरा असल्याचं आमच्या टीमला आढळलं. पण रविवारी जेव्हा टीम परत तपासणी करायला गेली तेव्हा उदय अशक्त वाटला आणि तो खाली मान घालून चालत होता. त्यानंतर त्याला ट्रँक्वीलाईज करून उपचारांसाठी आणलं गेलं. पण यादरम्यान त्याने प्राण सोडला.”
 
जेएस चौहान यांच्या सांगण्याप्रमाणे, “प्राथमिक पोस्टमाॅर्टम रिपोर्ट हार्ट अटॅककडे इशारा करतो. पण पूर्ण रिपोर्टमध्ये ब्लड टेस्टसोबत बाकी सगळ्याच गोष्टी सविस्तरपणे असतील. त्या रिपोर्टची वाट बघतोय.”
 
बीबीसी सोबत झालेल्या खास संवादात चित्ता कंझर्वेशन फंडच्या डायरेक्टर लाॅरी मार्कर यांनी नामिबियावरुन सांगितलं की, “शास्त्रज्ञ म्हणून आम्ही नेक्रोपसी टेस्टची वाट बघू. यामध्ये जनावरांच्या मृत्यूच्या मागच्या कारणांची माहिती मिळते. यासोबतच जर त्यांच्या आरोग्यासंदर्भात कुठली अडचण समस्या निर्माण होते असेल तर त्यावर तोडगा काढला जाईल ज्यामुळे भविष्यात त्यांचे मृत्यू होणार नाहीत.”
 
चित्ते आणि किडनी फेल होण्याचा इतिहास
किडनी फेल होऊन चित्यांच्या मृत्यूंचं प्रमाण लक्षणीय आहे. यातील परस्परसंबंध संशोधनाद्वारे डाॅक्टर आणि शास्त्रज्ञांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
अमेरिका सरकारच्या नॅशनस सेंटर फाॅर बायोटेक्नोलाँजी इन्फ्राॅर्मेशनने साल 1967 ते 2014 दरम्यान बंदिस्त वातावरणात राहणाऱ्या 242 चित्त्यांचा अभ्यास केला.
 
एमिली मिचेल यांच्या नेतृत्वात झालेल्या या अभ्यासातून काही महत्त्वपुर्ण गोष्टी समोर आल्या. या अभ्यासातून पुढे आलं की, “बंदिस्त वातावरणात राहणाऱ्या काही चित्त्यांमध्ये कमी वयातच किडनी खराब होण्याचे लक्षणं दिसतात. हे पुढे जाऊन मृत्यूला कारणीभूत ठरतात. संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला की, बंदिस्त वातावरणात किंवा कंट्रोल्ड वातावरणात राहणारे चित्ते जास्त तणाव घेतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवर होतो.”
 
चित्तांच्या संरक्षणासाठी काम करणारी नामांकित संस्था चित्ता कंझर्वेशन फंडने ही एका रिसर्च पेपरमधून यावर लक्ष वेधलं आहे की, चित्त्यांमधले किडनी फेल होण्याचे लक्षणं सुरुवातीलाच कसे ओळखायचे ज्यामुळे त्यांच्यावर प्रभावी उपचार होऊ शकतील.
 
मध्य प्रदेशात चित्ते
मध्य प्रदेशातल्या 1.15 लाख हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या पाच ते सात वयोगटातील वीस चित्त्यांना एक महिना क्वारंटाईन झोनमध्ये इथल्या वातावरणाशी समरस होण्यासाठी ठेवण्यात आलं होतं.
 
पुढच्या टप्प्यात या चित्त्यांना क्वारंटाईन झोनमधून बाहेर काढून जंगलातील इतर प्राणी आणि शिकाऱ्यांपासून संरक्षणासाठी चार किलोमीटरच्या परिसरात ठेवण्यात आलं.
 
भारतात नामिबियामधून आठ चित्ते आणले आणि दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले. यामधले आता अठरा चित्ते जिवंत आहेत. भारतात आणलेल्या चित्त्यांना आफ्रिकेतल्या अशा अभयारण्यांमधून आणलंय जिथे त्यांचं प्रजनन योग्य पद्धतीने झालंय. दक्षिण आफ्रिकेत जवळपास 50 असे अभयारण्य आहेत ज्यामध्ये 500 प्रौढ चित्ते आहेत.
 
बीबीसी सोबत झालेल्या खास संवादात चित्ता कंझर्वेशन फंडच्या डायरेक्टर लाॅरी मार्कर यांनी नामिबियावरुन सांगितलं की, “या प्रोजक्टसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि आशा करते की सगळं सुरळीत होईल. हे चित्ते वाघ आणि बिबट्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्राण्यांच्या सोबत राहून वाढले आहेत. भारतातही ते आपलं घर बनवतील. त्यांना फक्त थोडा वेळ द्या.”
 
लाॅरी मार्कर यांच्या सांगण्यानुसार, “आमच्या टीमला कुनो राष्ट्रीय उद्यान हे चित्त्यांना ठेवण्यासाठी योग्य वाटलं. पहिल्या खेपेला मी स्वत: भारतात आले होते. सगळेच निकष हे जागतिक स्तरावरचेच आहेत.”
 
काळजीची कारणं कोणती आहेत?
जगभरात चित्त्यांची संख्या अंदाजे 7000 आहे. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त चित्ते हे दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोत्सवानामध्ये आहेत.
 
भारताने 1950 च्या दशकात चित्त्यांना नामशेष घोषित केलं होतं. त्यावेळेस देशामध्ये एकही जिवंत चित्ता शिल्लक नव्हता.
 
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एका मोठ्या मांसाहारी जनावराला एका खंडातून दुसऱ्या खंडातल्या जंगलात आणलेलं आहे.
 
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जंगली चित्त्यांना एखा जागेवरुन दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे हे आव्हानात्मक काम आहे. कारण, माणसांसोबतचा संपर्क आणि पिंजऱ्यामुळे चित्ते तणावग्रस्त होतात.
 
वाघांवर अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे वाईल्ड लाईफ फिल्ममेकर अजस सूरी यांनी सांगितलं की, “वाघांना दुसऱ्या अभयारण्यांमधून इथे आणून वसवणं शक्य आहे. पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत याबद्दल फार अंदाज लावले जाऊ शकत नाही.”
 
दुसरीकडे सप्टेंबर 2022 मध्ये कुनोमध्ये आगमन झाल्यानंतर चित्त्यांची संख्या वाढली आहे. 70 वर्षांनंतर चार निरोगी चित्त्यांचा कुनोमध्ये जन्म झाला.
 
Published By - Priya Dixit