सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (17:24 IST)

उत्तर भारतातील अनेक राज्यातून थंडी गायब पाऊस सुरू!

उत्तर भारतातील अनेक राज्यातून थंडी गायब झाली असून वातावरणात मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसानं हजेरी  लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट  देखील झाली आहे. आज पुन्हा दिल्लीसह उत्तरेतील काही भागात हवामान खात्यानं (IMD)पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऐनवेळी पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची पुरती धांदल उडताना दिसत आहे. आज सकाळपासूनच दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा आणि हरियाणाच्या अनेक भागांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 
 
तसेच 28 फेब्रुवारीपासून उत्तर-पश्चिम भारतात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 मार्चपर्यंत याठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार जाणवले आहेत. गेल्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील अनेक भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आज पुण्यात यंदा पहिल्यांदाच किमान तापमानाचा पारा 22 अंशापार गेला आहे.