सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (08:11 IST)

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी  यांनी रविवार पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला. तीन कृषी कायदे (Farm Laws), कोविड-19चं महासंकट (Covid-19 Pandemic) अर्थव्यवस्थेची घसरण आणि दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. भारतातली लोकशाही (Indian Democracy) ही आत्तापर्यंतच्या सर्वात कठिण काळातून जात असून गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने केलेले कृषी कायदे हे काळे कायदे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
नव्याने नियुक्त केलेले काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यप्रभारी यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकार देशातल्या नागरीकांचे अधिकार हे फक्त काही मुठभर उद्योगपतींना सोपवू इच्छित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
पक्षात नव्या नियुक्त्या आणि फेरबदल केल्यानंतरची त्यांची ही पहिलीच बैठक होती. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती, नेतृत्व, नीती, नियत आणि योग्य दिशेचा अभाव आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली असून या आधी असं कधीच झालं नव्हतं.
 
केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध खंबीरपणे काँग्रेस लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये व्यापक फेरबदल करण्यात आले होते. वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आलं होतं. तर अनेक तरुण चेहेऱ्यांना संधी देण्यात आली होती. अध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी यासाठी काही नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिलं होतं.
 
त्यावरून राहुल गांधी यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर आगपाखड केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये मोठं नाट्य रंगलं होतं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी अनेक नेत्यांनी केली होती.