मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (08:26 IST)

ग्राहकांनो आपली कामे उद्याच पूर्ण करा; बँका ‘इतक्या’ दिवस राहणार बंद

देशातील बँका ४ दिवस बंद राहणार असून बँकेचे कर्मचारी २८ – २९ तारखेला संपावर जाणार आहेत. त्याआधी शनिवार, रविवारची सुट्टी असेल. त्यामुळे बँका शनिवार पासून सलग ४ दिवस बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे.

या संपामुळे स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ५ लाखांपेक्षा अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा करण्यात आला आहे.बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण, बॅंकेतील कामाचे आऊटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीमध्ये आहेत.

या बरोबरच लोकसभेतील (Lok Sabha) अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, एआयबीओए, बेफी आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन संपात सहभागी होणार आहे. सहकारी बॅंका, काही विदेशी बॅंका, जुन्या खासगी बॅंका, ग्रामीण बॅंकामधील कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा यावेळी केला आहे.

तसेच ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सांगितले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान सार्वजनिक क्षेत्रामधून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना जास्त प्रमाणात बसणार आहे. या देशात सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.