शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (09:44 IST)

सामूहिक बलात्कारः हैदराबादमध्ये 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, 5 पैकी 3 आरोपी अल्पवयीन

rape
सुरेखा अब्बरी, बाला सतीश
 
हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी काल 3 जूनच्या रात्री माध्यमांना याविषयी माहिती दिली आहे.
 
याप्रकरणी 5 आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
तर इतर 2 आरोपींपैकी 18 वर्षीय सादुद्दीन मलिका पोलिसांनी अटक केली असून उमैद खान मात्र फरार झाला आहे.
 
आज 4 जूनच्या सकाळी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली जाणार असून इतर तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
 
पुढच्या 48 तासांत या तीनही आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
टोयोटा इन्होव्हा या गाडीत मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. गाडीचा प्लेट क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात नोंदवला गेला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अद्याप या गाडीचा शोध पोलिसांना लागलेला नाहीये.
 
या प्रकरणातील आरोपींनी दारूच्या नशेत हे कृत्य केलं नसल्याचं मुलीच्या जबाबाबतून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीसाठी ही मुलगी 28 मे रोजी ज्युबिली हिल्स परिसरातील अम्नेसिया अँड इन्सोमिया या पबमध्ये गेली होती. पण या पार्टीत दारूचा समावेश नव्हता, असं पबचं म्हणणं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
 
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगी आणि मुलांचा तो ग्रूप पबमधून बाहेर आला आणि त्यांनी तिला घरी सोडण्याची ऑफर दिली. त्यानंतर हे सगळे एका कारमध्ये बसून पेस्ट्री शॉपमध्ये गेले. त्यानंतर मग या मुलांनी तिला कारमध्येच एका बाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला.
 
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील 31 मे च्या रात्री ज्युबिली हिल्स पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार दिली. आपल्या मुलीला धक्का बसला असून ती याहून अधिक माहिती सांगण्याच्या स्थितीत नाही असं त्यांनी सांगितलं.
 
पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 आणि 325 तसेच पॉस्को कायद्यांतर्गंत 9 आणि 10 कलमानुसार एफआयआर दाखल करुन घेतला.
 
कलम 354 हे महिलेच्या विनयभंगासंदर्भात आहे तर सदर मुलगी 17 वर्षांची म्हणजे अल्पवयीन असल्यामुळे पॉस्को कायद्यांतर्गतही कलमे लागू करण्यात आली आहेत. पोलिसांनी या मुलीला 'भरोसा' या मदतकेंद्रात पाठवले. या केंद्रात महिला पोलीस पीडित मुलींचं समुपदेशन, चर्चा, विचारपूस करतात.
 
हैदराबाद पश्चिम परीक्षेत्राचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी सांगितले, "या मुलीने मदतकेंद्रातील चर्चेत आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. मात्र ती पाच आरोपींपैकी एकाचेच नाव आठवू शकली.
 
या माहितीच्या आधारे तसेच कॉल डेटा, सीसीटीव्ही चित्रिकरण याच्याआधारे पोलिसांनी इतर चार आरोपींची ओळख पटवली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार एफआयआरमध्ये बदल करण्यात आला आणि सामूहिक बलात्काराचे कलम 376 ड आणि पॉस्को कायद्यातील इतर कलमांचा समावेश करण्यात आला."
 
राजकीय वातावरण तापलं
या प्रकरणाची बातमी मीडियात आल्यानंतर शहरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी भाजप पक्षानं सत्ताधारी पक्षाला आणि सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
 
याप्रकरणातील आरोपी हे सत्ताधारी टीआरएस आणि एआयएमआयएम पक्षाच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप भाजपनं केला आहे.
 
याप्रकरणात तेलंगण राज्याचे गृहमंत्री महमूद अली यांचा नातू, एआयएमआयएम पक्षाच्या आमदाराचा मुलगा आणि वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
 
याप्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भाजपनं ज्युबिली हिल्स परिसरातील पोलीस स्टेशनबाहेर निदर्शन केलं.
 
आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे.
 
गृहमंत्र्यांच्या नातवाचा या प्रकरणात समावेश नसल्याचं हैदराबाद पश्चिम परीक्षेत्राचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी माध्यमांना सांगताना स्पष्ट केलं आहे.
 
एआयएमआयएम पक्षाच्या आमदाराचा मुलगा या सहभागी आहे की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत, असंही ते म्हणाले.
 
याप्रकरणातील एक आरोपी हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा मुलगा असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. पण, तो अल्पवयीन असल्यामुळे त्यांनी त्याबाबतची माहिती दिलेली नाही.
 
याप्रकरणातील दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करा, अशी मागणी टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री कलवाकुंतला तारका रामाराव यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
 
हैदराबामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचून धक्का बसला आहे. याप्रकरणी त्वरित आणि कठोर कारवाईची गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्यांचं स्टेटस पाहून त्यांना सोडू नका, असं केटीआर यांनी 3 जूनच्या रात्री ट्विट केलं आहे.