मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , गुरूवार, 15 फेब्रुवारी 2018 (09:19 IST)

शहिदांना धर्म नसतो : अनबू

सुंजवान हल्ल्यात शहीद झालेले पाचही जवान मुस्लीम होते, असे सांगत शहिदांच्या बलिदानाला धार्मिक रंग देणारे एआयएआयएचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लष्कराने फटकारले आहे. शहिदांना कोणताही धर्म नसतो. आम्ही बलिदानाला धार्मिक रंग देत नाही. ज्यांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात, अशा शब्दात कमांडर लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी ओवेसी यांना त्यांचे नाव न घेता फटकारले आहे.
 
ओवेसी यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केले होते. सुंजवानधील हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण काश्मिरी मुसलामान होते. जे लोक मुसलमानांना आजही पाकिस्तानी समजतात, त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे, असे ओवेसी म्हणाले होते. 
 
काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप दोघेही सत्तेत बसून नाटके करत असून सत्तेची मलई खात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.
 
ओवेसी यांच्या या वक्तव्याचा त्यांचे नाव न घेता देवराज यांनी समाचार घेतला. शत्रूंना नैराश्य आले आहे. जेव्हा ते सीमेवर असतात तेव्हा ते लष्कराच्या तळावर हल्ला करतात, असे सांगतानाच देशाच्या विरोधात जेकोणी उभे राहतील ते आमच्यासाठी अतिरेकीच असून आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशाराही देवराज यांनी दिला.
 
माझ्या घरातही एक धार्मिक स्थळ असून तिथे सर्व धर्मांची प्रतीके आहेत. ज्या लोकांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते अशा प्रकारची विधाने करतात, असेही त्यांनी सांगितले. तरुणांचे दहशतवाद्यांकडे आकर्षित होणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगतानाच, सोशल मीडियामुळेच तरुण दहशतवादाकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.