गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (16:01 IST)

गंगा विलास क्रूझ कशी आहे? बिहारचे नेते तिला का विरोध करत आहेत?

आज 13 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअल माध्यमातून वाराणसी येथील जगातील सर्वात लांब क्रूझ गंगा विलासला हिरवा कंदील दाखवला.
गंगा विलास क्रूझचा प्रवास वाराणसीतील रविदास घाट येथून सुरू होईल आणि बिहार, बंगालमार्गे बांगलादेशला वळसा घालून आसाममधील दिब्रुगड मध्ये संपेल.
हा प्रवास एकूण 51 दिवसांचा असेल. पण या क्रूझचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच त्याला बिहारमध्ये विरोध सुरू झालाय.
 
'गंगा विलास क्रूझ चालवणं म्हणजे जनतेच्या पैशाची लूट' असल्याचा आरोप बिहारमधील सत्ताधारी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केलाय.
 
ललन सिंह पुढे म्हटलेत की, 'क्रूझ चालवण्यासाठी दरवर्षी गंगा नदीत जमा होणारा गाळ काढला जाईल आणि पूर आल्यावर पुन्हा यात गाळ जमा होईल.'
 
पण केंद्राने मात्र गंगा विलास क्रूझचा प्रचार सुरू केलाय. तसेच या क्रूझमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देऊ केल्याचा दावा सुद्धा केंद्राने केलाय.
ही क्रूझ भारत आणि बांगलादेशातील 27 रिव्हर सिस्टीम पार करत सात नद्यांमार्गे प्रवास करेल. यात गंगा, भागीरथी, मेघना, हुगळी, जमुना, पद्मा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा समावेश आहे. या क्रूझमुळे 50 पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत.
 
याआधी या क्रूझने 56 तासांचा प्रवास करून 11 जानेवारीला उत्तरप्रदेशातील बलियामार्गे वाराणसी गाठलं होतं.
 
क्रूझचे संचालक राज सिंह सांगतात की, स्वदेशी तंत्रज्ञान आणि फर्निचरयुक्त हे क्रूझ भारतातील एकमेव असं क्रूझ आहे.
 
या क्रूझचं डिझाइन भारतातील आर्ट हिस्टोरियन डॉ. अन्नपूर्णा गरिमाला यांनी केलंय.
क्रूझची वैशिष्ट्ये
ही विशेष क्रूझ कोलकात्यातील एका शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. ही क्रूझ 2020 मध्ये तयार करून पूर्ण होती मात्र कोरोना साथरोगामुळे याचं उद्घाटन करता आलं नाही.
 
प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा या क्रूझमध्ये देण्यात आल्यात.
 
62.5 मीटर लांब, 12.8 मीटर रुंद आणि 1.35 मीटर खोल असलेल्या या तीन मजली क्रूझमध्ये एकूण 18 सूट म्हणजेच लक्झरी रूम्स आहेत.
 
रूममध्ये कन्व्हर्टिबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एअर कंडिशनर, सोफा, एलईडी टीव्ही, स्मोक अलार्म, अटॅच बाथरूम अशा सर्व सुविधा आहेत.
 
क्रूझवर ऑनबोर्ड जिम, स्पा, आउटडोअर ऑब्झर्व्हेशन डेक, खाजगी बटलर सेवा आणि प्रवाशांसाठी विशेष संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील सोय आहे.
 
क्रूझचं इंटेरिअर देशाची संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आलंय.
 
क्रूझचा प्रवासाचा रूट
ही क्रूझ 13 जानेवारीला वाराणसीहून निघेल, त्यानंतर 51 दिवसांनी म्हणजेच 1 मार्चला ही क्रूझ आसाममधील दिब्रुगडला पोहोचेल.
 
या 51 दिवसांत ही क्रूझ  भारतातील उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम अशा पाच राज्यांमधून प्रवास करत बांगलादेशकडे रवाना होईल. ही क्रूझ बांगलादेशात 15 दिवस मुक्कामी असेल. 
 
शिवाय या संपूर्ण प्रवासात पर्यटकांना विविध राज्यातील एकूण 50 पर्यटन स्थळांना भेटी देता येतील. यात जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नद्यांचे घाट आणि इतर ठिकाणांचा समावेश असेल.
 
पन्नास हजार रुपयांचं तिकीट
स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक घेणार आहेत. या क्रूझवर एकूण 36 प्रवाशांची राहण्याची सोय आहे. असं म्हटलं जातंय की, गंगा विलास क्रूझ सुरू झाल्यामुळे देशातील रिव्हर क्रूझ पर्यटनाला मोठी चालना मिळेल. आता या क्रूझच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर एका व्यक्तीसाठी दिवसाला 50 हजार रुपये खर्च आहे. विशेष म्हणजे संपूर्ण 51 दिवसांसाठी तिकीट बुक करणं बंधनकारक नाहीये. जर प्रवाशाला मध्येच कुठे उतरायचं असेल तर उतरू शकतात.
 
क्रूझचे संचालक राज सिंग बीबीसीशी बोलताना म्हणाले की, पुढच्या 2 वर्षांसाठीची तिकिटं आधीच बुक झाली आहेत.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचं म्हणणं आहे की, या क्रूझच्या उद्घाटनानंतर जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीस उतरेल. शिवाय पर्यटकांमध्ये ते खूप लोकप्रिय ठरेल.
 
तसेच यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असंही सोनोवाल म्हणाले.
सोनोवाल यांनी या क्रूझबद्दल माहिती देताना सांगितलं की, "ही क्रूझ म्हणजे आत्मनिर्भर भारताचं उदाहरण आहे. ही क्रूझ भारताची निर्मिती आहे. या क्रूझचं इंटेरिअर बनवताना देखील भारताचा सांस्कृतिक वारसा लक्षात घेतलाय."
 
सोनोवाल यांच्या म्हणण्यानुसार, सध्या या क्रूझवर येणारे सर्व प्रवासी स्वित्झर्लंडचे आहेत.
 
दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणाले की, गंगा विलास क्रूझमुळे आपल्याला आपल्या सांस्कृतिकतेशी एकरूप होण्याची संधी मिळेल, सोबतच भारताच्या विविधतेचे सुंदर पैलू पाहता येतील.
 
बिहारमध्ये आंदोलन
मात्र या क्रूझवरून बिहारमध्ये वाद रंगलाय.
 
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांचं म्हणणं आहे की, गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय. त्यामुळे अशा पद्धतीच्या योजना आम्ही बिहारमध्ये सुरू होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 
ललन सिंह हे विकासविरोधी असल्याचं भाजपने म्हटलंय. मात्र तेच दुसरीकडे बिहार सरकारमध्ये जेडीयूशी आघाडी असलेल्या आरजेडीने त्यांना पाठिंबा दिलाय.
 
भाजपच्या या वक्तव्यावर ललन सिंह म्हणाले, "मी गंगेविरोधात कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये. गंगेत साचलेला गाळ साफ करण्यासाठी क्रूझ सुरू करणं म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गाळाचं व्यवस्थापन करणं जास्त महत्त्वाचं आहे."
 
तसं बघायला गेलं तर दरवर्षी पुर आला की, गंगा नदीत गाळ साचतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा गाळाच्या समस्येबद्दल अनेकदा बोलून दाखवलंय.
 
गंगा विलास क्रूझ बक्सार येथून बिहारमध्ये दाखल होईल.
गंगा नदीच्या गाळाची समस्या बिहारमधील पाटण्यात सुरू होते आणि झारखंडमधील साहेबगंजपर्यंत पोहचेपर्यंत आणखीन वाढते.
Published By - Priya Dixit