सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2020 (10:43 IST)

केरळमध्ये सिनेमागृहे ३१ मार्च पर्यंत बंद

भारतामध्ये केरळ राज्यात करोनाचे सर्वाधिक म्हणजेच १२ रुग्ण आढळले आहेत. त्यावर उपाय म्हणून केरळ सरकारने राज्यातील सिनेमागृहे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टोव्हिनो थॉमसचा ‘किलोमीटर्स अँड किलोमीटर्स’ हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार होता. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत खासगी आणि सरकारी दोन्ही चित्रपटगृहे बंद राहतील, अशी माहिती केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अधिकारी थडियूस यांनी दिली.
 
मल्याळम अभिनेता टोविनो थॉमस याने याबाबत सोमवारी फेसबुकवर पोस्ट केली होती कि, करोना व्हायरसच्या प्रभावामुळे ‘किलोमीटर्स अँड किलोमीटर्स’ या चित्रपटाचे प्रकाशन पुढे ढकलले जात आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात चांगली पध्दत म्हणजे सामूहिक मेळावे, सभा आणि गेट-टू-गेदर्स टाळणे, यामुळेच आपण ‘किलोमीटर्स अँड किलोमीटर्स’ ची रिलीज डेट पुढे ढकलत आहोत. हा चित्रपट अनेक दिवसांचे स्वप्न आणि प्रयत्न आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य आणि आजूबाजूचे लोकांचे आरोग्य आहे. आम्ही निपाहवर मात करुन संपूर्ण जगासाठी मॉडेल बनलेली माणसे आहोत, आपण यावरही मात करू. आपण जबाबदार नागरिक असलो पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे, आपण शासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या लोकांचे संरक्षण केले पाहिजे.