जे इथले आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणे योग्य नाही
केंद्र सरकार एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत असून एनआरसी संदर्भात देशभरातून निषेध केला जात आहे. केंद्र सरकार देशातील जनतेवर एनआरसी लादत आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे, मात्र जे इथले आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणे योग्य नाही, असे सांगत केंद्र रकारकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे.
पुण्यामध्ये आोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पायलट म्हणाले, देशात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. आर्थिक मंदी आहे. मात्र मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.
केंद्र सरकार एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहे. त्यामुळे आज देशातील जनता केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ज्या पक्षांनी या कामाला मंजुरी दिली. त्या पक्षांची सत्ता असणार्या राज्य सरकारांचा हा कायदा आपल्या राज्यात लागू करण्यास विरोध आहे. त्यामुळे देशात आज असंतोष पसरला आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल पायलट यांनी केला.
काँग्रेस सरकारने नागरिकत्व आणि नागरिकत्व नोंदणी कायदा प्रस्तावित केला, हे जरी सत्य असले तरी आमच्या कायद्यात आणि भाजपच्या कायद्यात मोठी तफावत आहे, असे स्पष्टीकरण पायलट यांनी केले.
भाजपसमर्थक राज्यांमध्येच नागरिकत्वाचा कायदा लागू करण्यासाठी अनुकूलता नाही, तर राजस्थान हा कायदा लागू का करेल? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.