बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 25 डिसेंबर 2019 (13:12 IST)

सहा हजार कोटींच्या अटल जल योजनेला मंजुरी

महाराष्ट्रासह सहा राज्यांना होणार लाभ 
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. गावागावात पाणी पोहोचवण्यात यावे, यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या अटल जल योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

अटल जल योजनेला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ सहा राज्यांना होणार आहे. देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सहा राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची अंलबजावणी झाल्यास सहा राज्यांतील एकूण 8 हजार 350 गावांना थेट फायदा पोहोचणार आहे. अटल जल योजनेला मंजुरी मिळाल्याने गावातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून 6000 कोटी रूपयांचा फंड बनवण्यात आला आहे. यात 3000 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे असणार असून 3000 कोटी रुपये जागतिक बँक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात सहा राज्यात ही योजना लूागू करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 8 हजार 350 गावांत पाणी पोहोचवले जाणार असून नागरिकांची पाण्यासंबंधी जनजागृती केली जाणार आहे.