शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (16:44 IST)

महुआ मोईत्रांवरील हिरानंदानींच्या 'प्रतिज्ञापत्रा'चं अदानी कनेक्शन काय आहे?

mahua moitra
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एका व्यावसायिकाने संसदीय समितीकडे 'प्रतिज्ञापत्र' पाठवलं आहे.तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे नाव गेल्या पाच दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे.
 
गेल्या रविवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केला की, हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्याकडून 'रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेऊन' त्या संसदेत प्रश्न विचारतात, आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
 
संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी शुक्रवारी 'एनडीटीव्ही' वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत "दर्शन हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र मिळालं आहे आणि आवश्यक असल्यास महुआ मोईत्रा यांना बोलावलं जाऊ शकतं.", असं विधान केल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं.
 
काही महिन्यांपूर्वीच अदानी समूहाने 'एनडीटीव्ही'चे अधिग्रहण केलंय, हे येथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. महुआ मोईत्रा यांनी हे आरोप खोटे असल्याचं सांगत आपण तपास समितीला उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी 'बीबीसी'ने महुआ मोईत्रा यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्यांशी संपर्क साधला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.
 
मोईत्रा यांनी 'बीबीसी'ला पाठवलेल्या एका संदेशात म्हटलंय की, त्यांनी 15 मीडिया कंपन्यांना 'खोटं, द्वेषपूर्ण भावनेने प्रेरित बातमीदारी' केल्याचा आरोप करणाऱ्या कायदेशीर नोटीसा पाठवल्या आहेत.
 
निशिकांत दुबे यांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रात आरोप केलाय की, "महुआ मोईत्रा यांना हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी पैसे आणि महागड्या भेटवस्तू दिल्या आणि त्या बदल्यात महुआ यांनी संसदेत त्यांचे प्रश्न विचारले."
 
चार पानं ज्यांना 'प्रतिज्ञापत्र' म्हटलं जातंय
इंग्रजीत लिहिलेली चार पानं सोशल मीडियावर फिरत असून, ते दर्शन हिरानंदानी यांचे 'प्रतिज्ञापत्र' असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यात मोईत्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत.
 
सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या या दस्तऐवजात म्हटलंय की, महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांना संसदेच्या संकेतस्थळाचे लॉगिन आणि पासवर्ड दिलेला, त्याद्वारे ते महुआंच्या वतीने प्रश्न लिहीत असत आणि संबंधित मंत्रालयांकडून त्याची उत्तरे मागविण्यात यायची.
 
'एनडीटीव्ही'च्या विशेष मुलाखतीत आचार समितीचे अध्यक्ष म्हणाले की, भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दुबे यांना पुरावे सादर करण्यास सांगितलं असल्याचंही विनोद सोनकर यांनी म्हटलंय.
 
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेमध्ये अनेक पात्रांचा समावेश आहे आणि जितकी पात्र, तितके जास्त कंगोरे त्याला आहेत.
 
या प्रकरणाला कशी सुरूवात झाली आणि आता काय काय घडतंय हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी त्या पात्रांसोबतचा हा वाद समजून घेणं आवश्यक आहे.
 
हे सर्व कसं सुरू झालं?
रविवारी निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेतल्याचा आणि संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला आणि त्यांची चौकशी करून संसदेच्या अध्यक्षांकडे त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
 
निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत देहाडराय यांच्या तक्रारीवरून हे आरोप केले आहेत.
 
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या तक्रारीवरून हा आरोप केल्याचं जय अनंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर मान्य केलंय.
 
या आरोपांना उत्तर देताना महुआ यांनी 'एक्स' वर अनेक पोस्ट केल्या आहेत.
 
रविवारी महुआ यांनी लिहिलं की, "बनावट पदवीधारक आणि भाजपच्या अनेक लोकांवर विशेषाधिकार भंगाचे खटले प्रलंबित आहेत. सभापतींनी या प्रकरणांची कारवाई पूर्ण करून माझ्याविरुद्ध त्वरित चौकशी सुरू करावी, मी त्या चौकशीचं स्वागत करेन. तसंच, माझ्या दारात येण्यापूर्वी 'ईडी' अदानी कोळसा घोटाळ्यात कधी एफआयआर दाखल करतंय याची मी वाट पाहत्येय.”
 
जय अनंत देहादराय कोण आहे?
 
सर्वप्रथम, निशिकांत दुबे यांच्या पत्राचा आधार घेणारी व्यक्ती कोण आहे, म्हणजेच कोणाच्या सांगण्यावरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं ते जाणून घेऊया.
 
महुआ मोईत्रा यांनी जय अनंत देहादराई यांना 'जिल्टेड एक्स' म्हणजेच पूर्वाश्रमीचा निराश प्रियकर म्हटलंय.
 
जय अनंत 35 वर्षांचे आहेत. जय अनंत यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत आणि त्यांनी माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांच्या चेंबरमध्ये काम केलंय.
 
ते आता लॉ चेंबर्स ऑफ जय अनंत देहादराय नावाने स्वतःची प्रॅक्टीस करतात. त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एलएलएमचं शिक्षण घेतलंय.
 
'टाइम्स ऑफ इंडिया' वर्तमानपत्रामध्ये ते 'द इरेव्हरंट लॉयर' या नावाने लेखही लिहितात.
 
जेव्हा आम्ही त्यांच्या सोशल मीडिया खात्याची पडताळणी तेव्हा आम्हाला महुआ मोईत्रांचा पाळीव कुत्रा हेन्रीसोबत जय अनंत यांचे अनेक फोटो सापडले.
 
हेन्रीला आपल्यासोबत ठेवण्यासाठी महुआ मोईत्रा आणि जय अनंत यांच्यात वाद सुरू असल्याचं काही प्रसारमाध्यमांच्या अहवालात म्हटलंय.
 
जय अनंत यांच्या एक्स-फीडवरून दिसून येतं की राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यात ते अजिबात संकोच करत नाहीत.
 
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूरदर्शी नेता म्हणून वर्णन केलंय आणि दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना बनावट स्वाक्षरी वाद प्रकरणी 'निर्लज्ज' म्हटलंय.
 
हिरानंदानींचे 'प्रतिज्ञापत्र' काय आहे?
 
 
रविवारी हे आरोप उघडकीस आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हिरानंदानी ग्रुपने 'भाजप खासदाराचे आरोप पूर्णपणे फेटाळले आणि ते निराधार असल्याचं' निवेदन प्रसारित केलं.
 
मात्र गुरुवारी दुबईत राहणाऱ्या दर्शन हिरानंदानी यांच्या 'प्रतिज्ञापत्रा'बाबत चर्चा सुरू झाली, ज्याला शुक्रवारी नैतिक समितीच्या प्रमुखांनी दुजोरा दिला.
 
या आरोपांना प्रत्युत्तर देताना महुआ मोईत्रा यांनी म्हटलंय की, हे संपूर्ण 'प्रतिज्ञापत्र' एक 'विनोद' आहे आणि त्याचा मसुदा 'पंतप्रधान कार्यालय' (पीएमओ) मध्ये तयार करण्यात आलाय.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हिरानंदानी ग्रुपच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाने मीडियामध्ये हे दस्तऐवज प्रसारित केलेत.
 
पण हे दस्तऐवज खरं 'प्रतिज्ञापत्र' आहे की नाही याची खात्री 'बीबीसी'ला करता आलेली नाही.
 
अदानी कनेक्शन काय आहे?
 
'प्रतिज्ञापत्र' म्हणून वर्णन केलेल्या पानांमध्ये दर्शन हिरानंदानी यांनी म्हटलं की, "जेव्हा मी मोईत्रा यांना संसदेत विचारण्यासाठी अदानी समूहावरील प्रश्नांचा पहिला संच दिला, तेव्हा त्यांना त्या प्रश्नांना विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांतील एका वर्गाकडून खूप पाठिंबा मिळाला. यानंतर त्यांनी (महुआ मोईत्रा) मला अदानी समूहाविरुद्ध प्रश्न विचारण्यात मदत करत राहायला सांगितलं. यासाठी त्यांनी मला त्यांचे संसदेचे लॉगिन आणि पासवर्डही दिला, जेणेकरुन मी महुआ मोईत्रांच्या वतीने थेट प्रश्न पाठवू शकेन."
 
या पानांमध्ये दर्शन हिरानंदानी यांनी काही पत्रकार आणि प्रसारमाध्यम कंपन्यांवर आरोप केलाय की ते महुआ मोईत्रा यांच्या संपर्कात होते आणि महुआ या पत्रकारांशी सतत बोलत असत.
 
खासदार आणि पत्रकार एकमेकांच्या संपर्कात असण्याबाबत काय अनैतिक किंवा अयोग्य आहे, किंवा संपर्कात आल्यानंतर काय केलं गेलं याचा उल्लेख नाही.
 
या पानांवर लिहिलंय की, "अदानी ग्रुपवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी त्या सुचेता दलाल, शार्दुल श्रॉफ आणि पल्लवी श्रॉफ यांसारख्या अनेकांची मदत घ्यायच्या. हि लोकं महुआ यांना खोटी माहिती देत असत. राहुल गांधींनीही त्यांना संसदेत अदानी समूहावर प्रश्न विचारण्यासाठी मदत करत असत. महुआ फायनान्शिअल टाईम्स, द न्यूयॉर्क टाईम्स आणि बीबीसी यांसारख्ाय आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांशीही वारंवार संवाद साधत असत."
 
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम कंपन्यांचा त्यात केवळ उल्लेख आहे. मात्र, कुठेही वस्तुस्थिती, नावं, तपशील किंवा पुरावे दिलेले नाहीत, खासदारांसोबत पत्रकारांनी मारलेल्या गप्पांचे वर्णन अनोखी घटना असल्यासारखं वर्णन केलं गेलंय.
 
सुचेता दलाल या ज्येष्ठ व्यावसायिक पत्रकार आहेत आणि त्यांनी हर्षद मेहता घोटाळ्यासह अनेक मोठे घोटाळे उघडकीस आणलेत, त्यांनी या प्रकरणात आपले नाव समाविष्ट केल्याबद्दल ट्विट केलंय.
 
सुचेता यांनी लिहिलंय की, "मी महुआ मोईत्रा यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मी त्यांचे ट्विट कधीतरी रिट्विट केले असावेत. मी पल्लवी श्रॉफलाही ओळखत नाही, मी शार्दुल श्रॉफला फार पूर्वीपासून ओळखते. मी आव्हान करते की, कुणीही आमच्यामध्ये साटंलोटं असल्याचं सिद्ध करून दाखवावं.
 
दुसऱ्या एका ट्विटमध्ये सुचेता दलाल यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी लिहिलेल्या अहवालाचा हवाला दिलाय. हा अहवाल 'एस्सार' समूहाच्या कर्जमाफीबद्दल आहे.
 
सुचेता दलाल यांनी ट्विटरवर हा अहवाल शेअर केला तेव्हा महुआ मोईत्रा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आणि लिहिलं होतं की, "सुचेता या अहवालाची माहिती माझ्यासोबत शेअर करा."
 
याबाबत माहिती देताना सुचेता यांनी शुक्रवारी लिहिलं की, "महुआ मोईत्रा यांनी माहिती विचारली असतानाही मी त्याच्याशी संबंधित माहिती शेअर केली नाही."
 
महुआ मोईत्रा यांनी आतापर्यंत काय म्हटलंय
 
रविवार ते गुरुवारपर्यंत दररोज या प्रकरणात एकामागून एक आरोप होतायत. महुआ मोईत्रा संसदेत निर्भीडपणे प्रश्न विचारण्यासाठी ओळखल्या जातात.
 
महुआ त्या मोजक्या खासदारांपैकी एक आहेत ज्या गौतम अदानी यांची कंपनी - अदानी समूहाशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेबाबत सडेतोड प्रश्न विचारत असतात.
 
या संपूर्ण वादाबाबत महुआ मोईत्रा यांनी आरोप केलाय की, "भाजपला मला कसंतरी लोकसभेतून निलंबित करायचंय आहे आणि अदानींवरील माझ्या प्रश्नांबाबत माझं तोंड बंद करायचंय."
 
हिरानंदानी ग्रुपच्या उत्तरानंतर महुआ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर तपशीलवार निवेदन प्रसारित केलंय.
 
महुआ यांनी लिहिलंय की, "तीन दिवसांपूर्वी हिरानंदानी ग्रुपने एक प्रेस रिलीझ प्रसिद्ध करून सांगितलेलं की, त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. आज त्यांनी आरोपांना सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. हे प्रतिज्ञापत्र कंपनीच्या अधिकृत लेटरहेडवर नव्हे तर साध्या पांढ-या पेपरवर लिहिलेलं आहे, निवेदनाच्या शेवटी स्वाक्षरी आहे आणि प्रतिज्ञापत्र कुठे आणि कोणत्या दिवशी लिहिलंय याची कसलीही नोंद नाही.
 
साधारणपणे, अशी कायदेशीर आणि अधिकृत निवेदनं कंपनीच्या लेटरहेडवर लिहिली जातात आणि शेवटी लिहिणा-याचे नाव, स्वाक्षरी, लिहिणा-याचा पत्ता किंवा ईमेल आणि कंपनीचा अधिकृत शिक्का असतो.
 
अदानी समूहानेही या संदर्भात निवेदन प्रसारित केलंय
निवेदनात म्हटलंय की, "सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील जय अनंत यांनी सीबीआयला पाठवलेल्या तक्रारीत सांगितलंय की, खासदार महुआ मोईत्रा आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी मिळून अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांना गुन्हेगारी कटाचा एक भाग म्हणून लक्ष्य केलंय. ही तक्रार आमच्या 9 ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनाला खरं ठरवते की, काही गट आणि लोकं आमचे नाव आणि प्रतिष्ठा खराब करण्यासाठी जास्तीचं काम करताहेत,
 
महुआ मोईत्रा यांनी सीबीआय तपासाच्या मागणीवर म्हटलंय की, "माझ्यावरील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सीबीआय तपासाचं मी स्वागत करते, परंतु त्याआधी सीबीआयने अदानींच्या अनियमित मालमत्ता, आर्थिक व्यवहार, बेनामी खात्यांचा तपास पूर्ण करावा आणि त्यानंतर लगेच माझी तपासणी करावी. ."
 
राजकीय प्रतिक्रिया
काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी म्हणाले की, एक विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट उद्योगपतीमुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागतोय.
 
"एखाद्या विशिष्ट उद्योगपतीला वाचवण्यासाठी सरकार इतकं उत्सुक का आहे? हा प्रश्न कोणी विचारला तर त्याला देशाचा शत्रू घोषित केले जाण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट उद्योगपतीच्या नफ्यावर खुद्द राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला असता, त्यांच्यावरही कारवाई केली होती. आचारसंहिता कमिटी स्थापन करून अशाप्रकारे घाईघाईने चौकशी सुरू केल्याचं मी कधीही पाहिलेलं नाही.
 
शिवसेना (उबाठा) नेते अरविंद सावंत म्हणाले, "तुमच्यात (भाजप) हिंमत असेल तर त्यांच्याशी लढा... त्या सिंहीण आहेत. त्या संसदेत उघडपणे बोलतात. हे सत्ताधारी पक्षाचे गैरसमज आहेत. त्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाकडे कुठलेही ठोस उत्तर नाही. त्यामुळेच आता त्यांनी चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मी याचा तीव्र निषेध करतो."
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "पैसे घेवून प्रश्न विचारले जातात आणि महुआ मोईत्रा यांच्यावर असे आरोप करण्यात आले आहेत. याआधीही एक स्टिंग ऑपरेशन झाले होते, ज्यामध्ये अनेक खासदारांची नावं समोर आली होती. जर महुआ यांनी असं काही केलं असेल तर मग त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."
 
































Published By- Priya Dixit