हे तर उलटे चित्र,चायनिस मोबाईल काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’
भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’या स्मार्टफोनसाठी भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’झाल्याचं समोर आलं आहे.
वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी अॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर खास सेल आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता सेलला सुरूवात झाली, पण अॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच हा फोन सोल्ड आउट झाला. सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एकीकडे चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना हा चिनी फोन सेलमध्ये काही मिनिटांतच विकला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.