शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वेबदुनिया|

द ग्रे 8 चायना

ऑलिंपिक सहळ्याचे शानदार उद्घाटन

आज तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी त्याची इतिहासात नोंद होईल. पण चीनला ऑलिंपिकचे यजमानपद बहाल केले तर नवीन इतिहास घडेल, असे भाविनिक आवाहन आठ वर्षांपूर्वी चीनने मॉस्कोमध्ये भऱलेल्या बैठकीत केले होते.       
आठ-आठ-आठ चा मुहूर्त साधून चीनचा रहस्यमय पोलादी पडदा आज उघडला, आणि पुढील सतरा दिवस चालणार्‍या ऑलिंपिक नावाच्या 'क्रीडा महायुद्धाची' दणक्यात नांदी झाली. झगमगत्या नेत्रदीपक अविष्कराने पंधरा हजार कलावंतांनी उपस्थितांचे डोळे दीपवले. त्यावेळी चीनी मातीतील रुजलेल्या प्रगतीनेही डोळे विस्फारायला भाग पाडले. एकूण काय पश्चिमेकडे सुर्य मावळताना पूर्वेकडे नव्या महासत्तेचा 'लालिमा' पसरल्याची जाणीवही उपस्थितांना झाल्याशिवाय राहिली नाही.

बीजिंग येथील बर्ड नेस्ट मैदानावर सूर्यप्रकाशाला वाकुल्या दाखविणारी रोषणाई, लेझर शो, चायनीज मार्शल आर्ट करणारे 2 हजार आठशे तरुण, 'एक जग एक स्वप्न', या ऑलिपिक बोधवाक्याचा गजर आणि चिनी संस्कृतीचे प्रदर्शन करणार्‍या पंधरा हजार कलाकारांच्या प्रेक्षणीय अविष्कराने आज 29 व्या ऑलिंपिकचे दिमाखदार उद्घाटन करण्‍यात आले.

तब्बल 40 हजारांहून अधिक हेक्टर जमिनीवर हा उद्घाटन सोहळा रंगला. त्यासाठी जवळपास 1 लाख 50 हजार टन स्टिलचा उपयोग करुन ऑलिंपिक स्टेडियम तयार करण्‍यात आले होते. अशा या भव्य दिव्य सोहळ्याच्या उद्घाटनाने आज या खेळांच्या महाकुंभाला सुरुवात झाली.

या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक देशांचे प्रतिनिधी, राष्‍ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि खेळाडू बीजिंगमध्ये डेरेदाखल झाले असून, त्यांच्यासह लाखो लोकांनी याची देही याची डोळा हा उद्घाटन सोहळा पाहिला. याशिवाय कोट्यावधींनी दूरचित्रवाणीवरून हा सोहळा डोळ्यात साठवला.

परंपरा आणि प्रगती हे सूत्र धरून सादर करण्यात आलेल्या उद्गाटन सोहळ्याने जगाला डोळे विस्फारायला भाग पाडले. पारंपरिक गीत, संगीताबरोबर मार्शल आर्ट सारख्या विविध कला या प्रसंगी सादर करण्‍यात आल्या.

हा सोहळा म्हणजे चीनसाठी शक्तीप्रदर्शनाची संधी होती. 'आज तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी त्याची इतिहासात नोंद होईल. पण चीनला ऑलिंपिकचे यजमानपद बहाल केले तर नवीन इतिहास घडेल, असे भाविनिक आवाहन आठ वर्षांपूर्वी चीनने मॉस्कोमध्ये भऱलेल्या बैठकीत केले होते.

या आवाहनातील सच्चेपणा आजच्या उद्घाटन सोहळ्यातही जाणवला आणि खरोखरच एक इतिहास घडला. एरवी गूढ आणि रहस्यमय असलेल्या चीनचा पोलादी पडदा उघडला गेला आणि या काळात चिनी मातीत झालेल्या प्रगतीच्या खुणांना उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडायला लावले. उद्गाटन सोहळा हा निमित्त ठऱला.

या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातून अनेक देशांचे क्रीडाप्रेमी दाखल झाले आहेत. 205 देशांचे खेळाडू 305 पदकांसाठी झूंजणार आहेत. उद्घाटन सोहळ्यापूर्वी चीनसह विविध देशांच्या खेळाडूंनी संचलन केले.

यात भारताचा नेमबाज राजवर्धन राठोड याने भारतीय तिरंगा फडकत 57 जणांच्या भारतीय संघाचे नेतृत्व केले. 70 हजारांहून अधिक स्वयंसेवक आलेल्या खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा पाहूणचार करण्‍यात व्यस्त आहेत.