ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाची अनुपस्थिती
तब्बल आठवेळा ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या भारतीय संघावर यंदा प्रथमच नामुष्की ओढवली आहे. ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ नसल्याने केवळ भारतीय चाहतेच दु:खी झालेत असे नाही, तर ऑस्ट्रेलियन संघ आणि क्रीडा चाहत्यांनी भारताच्या अनुपस्थिती बद्दल खंत व्यक्त केली आहे. मार्च महिन्यात चिली येथे झालेल्या प्रवेश पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटेनकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऐंशी वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघाला ऑलिंपिक मधून बाहेर राहावे लागत आहे. ही खंत साऱ्यांनाच बोचत आहे. ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघाचा कर्णधार बेवन जॉर्ज यानेही भारतीय संघ नसल्या बद्दल खंत व्यक्त केली असून, भारतासारखा बलाढ्य संघ नसणे हेच आपल्याला पटत नसल्याचे तो म्हणाला. पुढच्या ऑलिंपिकमध्ये भारताचा समावेश असेल अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.