शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (08:23 IST)

एसएमएस’द्वारे शॉक दिल्यानंतर महावितरणकडून दखल, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागितली पंधरा दिवसाची मुदत – प्रा. उत्तम केंदळे

विजेचा प्रश्न नाही सुटला तर ग्राहक न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारानिगडी,यमुनानगर मधील वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक उत्तम केंदळे यांनी नागरिकांना महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘एसएमएस’ करायला लावले. त्यानंतर त्याची तत्काळ दखल घेत 15 दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. विजेचा प्रश्न नाही सुटला तर ग्राहक न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे नगरसेवक केंदळे यांनी सांगितले.
 
यमुनानगर भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. प्रभागातील नागरिक नगरसेवक उत्तम केंदळे यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत व्हावा याच्या मागण्या करत होते. केंदळे यांनी ही गेले अनेक दिवस महावितरण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे केंदळे यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रभागातील नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्याच्या नंबरवर एसएमएसद्वारे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीची मागणी केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरण अधिकाऱ्याने आज या ऑनलाईन आंदोलनाची दखल घेऊन नगरसेवक उत्तम केंदळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 
पुणे महावितरण विभागाचे मुख्य अधिकारी पंकज तगलपल्लेवार यांच्या सूचनेवरून कार्यकारी अभियंता गवारे व चौधरी, झोडगे साहेब यांनी नगरसेवक केंदळे यांची भेट घेतली.प्रभागातील आढावा घेऊन केंदळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांची मुदत मागितली व लवकरात लवकर वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिले.
 
पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये विज पुरवठा शटडाऊन करावा लागेल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. नगरसेवक केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना समस्याचे निराकरण करण्यासाठी दहा सप्टेंबर पर्यंत वेळ दिला आहे. दिलेल्या कालावधीमध्ये समस्याचे निराकरण झाले नाही.तर ग्राहक न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.