शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (08:01 IST)

पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमधील ऑटो रिक्षांचा 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ

Auto rickshaw fare hike in Pune
पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमधील ऑटो रिक्षांचा पहिल्या दीड कि.मी.साठीचा किमान भाडेदर १८ रुपयांवरून २१ रुपये करण्यात आला आहे. तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी देखिल १४ रुपये दर करण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू राहील, असे प्रादेशिक्ष परिवहन प्राधीकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे  यांनी कळविले आहे.
 
इंधनाचे दर वाढल्यानंतर रिक्षांची भाडेवाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. नुकतेच ११ नोव्हेंबरला प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पहिल्या दीड कि.मी.साठी १८ रुपयांऐवजी २१ रुपये अशी तीन रुपये दरवाढ तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी १२ रुपये ३१ पैशांऐवजी १४ रुपये अशी १ रुपया ६९ पैसे अशी भाडेवाढ करण्यावर एकमत झाले. ही भाडेवाढ येत्या २२ नोव्हेंबरपासून लागू करण्याचे आदेश डॉ. अजित शिंदे यांनी दिले आहेत.
यासोबतच रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत २५ टक्के अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय राहील. दोन्ही महापालिका क्षेत्र वगळून या कालावधीसाठी ४० टक्के अतिरिक्त भाडेदर राहील. प्रवाशांसोबत असणार्‍या सामानासाठी ६० बाय ४० सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या सामानासाठी ३ रुपये शुल्क द्यावे लागेल. रिक्षा चालकांना २२ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्याची मुदत राहील. विहीत मुदतीत मीटरचे कॅलिब्रेशन करून घेणार नाही त्यांच्यावर परवाना निलंबन  आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी आदेश दिले आहेत.