मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:03 IST)

बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

इतिहासलेखक बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. साडे आठ वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
 
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली.
 
बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवड्याभरापासून दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल होते
शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै 2021 रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं. या निमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
 
या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या.
 
महाराष्ट्रसह देशभरात इतिहास संशोधक, 'शिवशाहीर' आणि लेखक म्हणून ते ओळखले जायचे. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला.
पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केलं. 2015 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारहून अधिक व्याख्यानं दिली.
 
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले हा बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय होता. बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली.शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणायचे की "मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा."बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत: ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललिक कादंबरी लेखन, नाट्य लेखन केलं.'राजा शिवछत्रपती' ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. तसंच जाणता राजा हे नाटकही लोकप्रिय आहे.
 
2015 मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकाचे 1200हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक 5 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे.
 
दीडशे कलावंत, असंख्य प्राणी आणि भव्य रंगमंच हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे.
 
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.
 
'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला', हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. "बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही," असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.
 
त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.
 
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.
 
प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट करत म्हटलंय, "बाबासाहेब पुरंदरे यांनी खऱ्या अर्थानं शिवचरित्र त्यावेळच्या मुलांना समजून सांगितलं, त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली."
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत म्हटलं, "इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत."