बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (16:14 IST)

दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात तरुण-तरुणीने एकत्र झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणीने जागीच प्राण गमावले, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 
 
पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव येथे हा प्रकार घडला असून तरुणाची प्रकृती चिंताजनक असून पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती चाकण पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण- तरुणी हे मुळचे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून दोघांनी पुण्यातील चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथील एका शेतात गळफास घेतला आहे. दोघांनी शेतीच्या बांधावरील एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. या घटनेत गळफास बसून तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर संबंधित तरुण बेशुद्ध झाला.
 
स्थानिक नागरिकांनी हा प्रकार बघितल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केलं आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
जोडप्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही.