बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:30 IST)

पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव, 13 विद्यार्थ्यांना करोनाची लागण

कोरोनाचा कहर पुन्हा एकदा दिसून येत आहे. देशभरात महाराष्‍ट्र असे राज्य आहे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्‍या वाढत आहे. पुण्याच्या एक यूनिर्व्हर्सिटीचे 13 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. पुण्यातील एमआयटीमध्ये तब्बल 13 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे.
 
पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना करोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या विद्यार्थ्यांना आयसोलेट केले गेले आहे. आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रॅक आणि ट्रेस करण्यासाठी सर्व एसओपीचे पालन केले जात आहे. 
 
एमआयटीचे कुलसचिव प्रशांत दवे यांनी सांगितले की 'कॉलेजमध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असून हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना वर्कशॉपमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता. मात्र त्यापैकी एक करोना बाधित विद्यार्थी आढळून आल्यानंतर त्याच्या सहवासात असलेल्या 25 विद्यार्थ्यांची करोना चाचणी केली गेली त्यापैकी 13 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 
 
सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर आठ विद्यार्थी निगेटिव्ह आहेत तर चार विद्यार्थ्यांचा अहवाल अजून येयचा आहे तसेच या 25 विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने करोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की सध्या तरी बंद होणार नाही.
 
पुणे शहरात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 7 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण म्हणून प्रशासनाने रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच शहरातील दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सध्या दररोज सरासरी 7,000 चाचण्या घेतल्या जात असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे.
 
1 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत शहरात 2194 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान पुण्यात 1 लाख 41 हजार 551 चाचण्या घेण्यात आल्या. या महिन्यात शहराचा सकारात्मकता दर 1.54 टक्के नोंदवण्यात आला. गेल्या महिन्यात 20 डिसेंबर रोजी सर्वात कमी 33 रुग्णांची नोंद झाली होती. 25 डिसेंबर रोजीकोरोनाबाधित 149 प्रकरणे नोंदवली गेली. चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढली आहे.