1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (15:17 IST)

सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या “इतक्या” जणांवर गुन्हे दाखल

पुणे : येथे कोयता गॅंगची दहशत वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे या नऊ जणांमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
 
उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), तेजस संजय बधे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली, संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे), तसेच तीन अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. त्यांच्यामुळे अनेक सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील केले आहे. या गॅंगला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

आतापर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील अनेक परिसरामधून रोज कोयता गॅंगच्या दहशतीच्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर काही टोळकी स्टेट्स ठेवतात, या स्टेट्समुळे अनेक स्वरुपाचे गुन्हे घडतात. त्याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्यांवर रेखी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहेत.
 
दरम्यान, कोयता गँगच्या तरुणांची हलगी वाजवत धिंड काढण्यात आली होती. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची रस्त्यावर पोलिसांनी वरात काढली होती. त्यांची ही धिंड पाहून अनेक व्यापाऱ्यांना आनंद झाला होता. कोयता गॅंगविरोधात पुण्यामध्ये कॉंम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. रोज अनेक परिसरामध्ये पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. आतापर्यंत पुणे पोलिसांनी ७०० गुन्हेगारांची झाडाझडती घेतली त्यामधील अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
कोयता गॅंगचा म्होरक्या असलेला साहिल शेख, बिट्ट्या कुचेकर आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. परंतु अजून देखील कोयता गॅंगमधील अनेक गुन्हेगार पुण्याच्या रस्त्यांवर दहशत निर्माण करतांना दिसून येत आहे. त्यांच्यावर योग्या कारवाई करुन त्यांना जेरबंद करणे हे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor