शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (09:28 IST)

कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी दावेदार कोण?

voters
पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी- चिंचवड भागातील चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
 
पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदारांच्या निधनांमुळे रिक्त झालेल्या या जागांची निवडणूक बिनविरोध होणार का?
 
जर बिनविरोध झाली नाही तर भाजप आणि विरोधी पक्षांकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांचा आणि तिथल्या उमेदवारीसाठी असलेल्या दावेदार यांचा आढावा घेऊया.
 
कसबा मतदारसंघ
कसबा मतदारसंघ हा पुणे शहरात आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात येतो.
जुन्या पुणे शहरातला महत्त्वाचा भाग या मतदारसंघात येतो. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ या भागांचा समावेश होतो.
पुण्यातील जुन्या बाजारपेठेचा भाग जसं की लक्ष्मी रोड, तुळशीबाग याच मतदारसंघात आहे.
1995 सालापासून भाजप नेते गिरिश बापट कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते.
 
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरिश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.
 
गिरिश बापट यांच्या खासदार होण्यामुळे रिक्त झालेली कसबा पेठ मतदारसंघाच्या जागेतून 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा पुण्याच्या महापौर असलेल्या मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली.
कसबा मतदारसंघात मध्ये 2019 सालच्या निवडणुकीत एकूण 2 लाख 89 हजार 54 मतदार होते. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा 28 हजार 196 मतांनी पराभव केला.
 
या निवडणुकीत लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य मुक्ता टिळक आमदार म्हणून निवडून आल्या.
 
पण, पुढे काही काळाने त्यांना कर्करोगाचं निदान झालं. 57 व्या वर्षी 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांचं कर्करोगाशी झुंज देताना निधन झालं. यामुळे आता कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
 
कसब्यात भाजपकडून उमेदवारी कुणाला?
पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर कसब्यात भाजपकडून कोण उमेदवार असेल याची चर्चा सुरू झाली. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
 
1995 पासून इथे भाजपचाच आमदार आहे. आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते असा एक संकेत आहे.
 
पण सध्या राज्यातील सत्तासंघर्ष पाहता कोणता पक्ष काय भूमिका घेईल यावरुन पुढच्या रणनिती ठरू शकतात.
 
दरम्यान, भाजपकडून उमेदवारीसाठी टिळक कुटूंबियांचा विचार होऊ शकतो.
 
त्याचसोबत माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेवक गणेश बिडकर आणि धिरज घाटे यांचाही उमेदवारीसाठी भाजपकडून विचार केला जाऊ शकतो.
 
‘टिळक कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी’
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी उमेदवारीसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीरपणे उमेदवारीवर दावा केला.
 
पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबातील सदस्यांचा विचार केला जावा, असं शैलेश टिळक यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत संधी मिळाली तर निवडणूक लढवण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली.
 
“मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे. पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील,” असं शैलेश टिळक यांनी म्हटलं.
 
मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक हे सुद्धा सुद्धा भाजपमध्ये सक्रीय आहेत. भाजप युवा जनता मोर्चामध्ये कुणाल टिळक काम करत आहेत. यामुळे कुणाल टिळक यांचाही विचार उमेदवारीसाठी केला जाऊ शकतो.
 
भाजपची काय रणनिती आहे?
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक संदर्भात काय रणनिती असेल, कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते यासंदर्भात बीबीसी मराठीने भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याशी संवाद साधला.
 
त्यांच्या सांगण्यानुसार उमेदवारी कुणाला दिली जाईल याचा निर्णय पक्षातील वरिष्ठांकडूनच घेतला जाईल. अजून त्यासंदर्भात निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र निवडणुकीच्या कामाला भाजपकडून सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले.
 
“कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहीला आहे. आमचं तिथे काम आहे आणि मोठा जनसंपर्क आहे. यामुळे आम्ही येत्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही तिथे काम सुरू करत आहोत. तिथे बैठका घेतल्या जातील. उमेदवार कोण असेल हे देवेंद्र फडणवीस ठरवतील. निवडणूक होईल किंवा नाही होणार पण आमची तयारी सुरू राहील. ही बिनविरोध होईल की नाही हे देवेंद्र फडणवीस ठरवतील,” असं जगदीश मुळीक यांनी सांगितलं.
 
कसब्यात उमेदवार ठरवताना भाजपची दमछाक होणार आहे का?
कसब्यातून उमेदवार ठरवणं भाजपसाठी सोपं नाहीये. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तिथे इच्छूक कार्यकर्त्यांची संख्याही जास्त आहे. याविषयावर सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांनी सविस्तर विश्लेषण केलं.
 
"कसबा मतदारसंघात भाजपचा बेस राहिलेला. पंचवीस एक वर्ष तिथे भाजपचा स्ट्राँग बेस आहे. त्यामुळे तिथे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. गणेश बिडकर, धिरज घाटे, हेमंत रासने हे सगळे महापालिकेमध्ये पदाधिकारी होते. महापालिका संपताना ते प्रमुख पदांवर होते. यामुळे उमेदवारीसाठी या प्रत्येकाची इच्छा तिथे राहणार आहे. एखादा नगरसेवक स्ट्राँग व्हायला लागला की त्याचं आमदारकीचं स्वप्न असतं. त्यादृष्टीने या तिन्ही लोकांनी त्यांची त्यांनी तयारी पहिल्या पासून केलेली होती.”
 
“आज ना उद्या कसबा मतदारसंघात संधी मिळाली यासाठी त्यांची तयारी होती. आता भाजपमध्ये कसब्यात तीन चेहरे आहेत जे ठळकपणाने पुढे येतात. जर भाजपला निवडणूक टाळायची असेल तर कुटूंबातल्या कुठल्याही सदस्याला उमेदवारी देणं हा पर्याय असू शकतो. पण दुसऱ्या बाजूला उरलेल्या दीड -पावणे दोन वर्षांसाठी सुद्धा विधानसभेवर जायला इच्छूक असलेले कार्यक्रते आहेत. साधारणपणे इतका कमी काळ उरला असताना इच्छूक कार्यकर्ते राहत नाहीत. ते आहेत त्यामुळे आता भाजपसमोर थोडी अडचणीची परिस्थिती आहे.”
 
“मुक्ता टिळकांच्या कुटुंबातील सदस्यांचा उमेदवारीसाठी विचार करण भाजपला सोयीचं वाटू शकतं. पण हे जरी सोयीचं असलं तरिही प्रत्येक वेळी इतर मतदारसघांमध्ये भाजपने असं केलेलं नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुटूंबातील सदस्यांना उमेदवारी द्यावी की कार्यकर्त्यांना संधी द्यावी असा विचार भाजप करु शकतो." असं सम्राट फडणीस यांनी सांगितलं.
 
कसब्यात काँग्रेसकडून उमेदवार कोण?
2019 साली मुक्ता टिळक यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.
 
जर निवडणूक बिनविरोध झाली नाही तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांचंही नाव पुढे येऊ शकतं. याचसोबत रविंद्र धंगेकर, रोहित टिळक, कमल व्यवहारे यांचा विचार होऊ शकतो.
 
“निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजून कुठला प्रस्ताव आलेला नाही. पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढवेन,” असं अरविंद शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
चिंचवड मतदारसंघ
चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने 3 जानेवारी 2023 रोजी निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. ते सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.
 
2009 साली लक्ष्मण जगताप अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 साली भाजपकडून आमदार झाले.
 
चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. 2019 साली लक्ष्मण जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी अपक्ष आमदार राहुल कलाटेंचा पराभव केला होता.
 
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून कुणाला उमेदवार मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.
 
  लक्ष्मण जगताप यांचा गड राखणं भाजपसाठी सोपं आहे का?
चिंचवडमध्ये भाजपसमोरची आव्हानं थोडी वेगळी आहेत. चिंचवडची जागा स्वत:कडे राहणं हे पुढच्या पालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ संपादक मनोज मोरे यांना वाटतं.
 
"चिंचवड मधली पोटनिवडणूक जिंकणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे कारण तोंडावर पालिकेच्या निवडणुका आहेत. या विजयामधून वर्चस्व प्रस्थापित केलं जाऊ शकतं. चिंचवडमध्ये महत्त्वाचा अप मार्केट भाग आहे. पिंपळे सौदागर, राहटणी, वाकड, काळेवाडी, सांगवी हे मोठे भाग आहेत. इथे बाहेरुन येऊन स्थायिक झालेलेही बरेच लोकं आहेत. पुणे मुंबई हायवेलगतचा हा भाग आहे. भाजपचा इथे पराभव झाला तर राष्ट्र्वादीसाठी मोठी संधी निर्माण होईल. त्यामुळे चिंचवडमध्ये पराभव टाळणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे.”
 
“लक्ष्मण जगताप यांच्या तोडीचा आता दुसरा नेता नाहीये. लक्ष्मण जगताप लोकप्रिय होते पण मागच्या निवडणुकीतच त्यांचा निसटता विजय झाला होता. अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना एक लाखांच्यावर मतं मिळाली होती. जगतापांची इतकी लोकप्रिय असूनही राहील कलाटेंना एवढी मते मिळणं हे आश्चर्यकारक होतं. त्यामुळे भाजप चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणुकासाठीच प्रयत्न करणार. जर हरले तर त्यांना ते महागात पडू शकतं, असं मोरे यांनी म्हटलं. “जर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी एखादेवेळेस माघार घेऊ शकते. पण जर त्यांच्या भावांपैकी कुणाला उमेदवारी मिळाली तर निवडणूक होऊ शकते," असं मनोज मोरे यांनी सांगितलं.
 
चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?
लक्ष्मण जगताप यांचं पिंपरी-चिंचवड हे मुख्य कार्यक्षेत्र राहिलं आहे. त्यांचा तिथला दांडगा जनसंपर्क होता. तसंच लक्ष्मण जगताप एकेकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळचे होते. चिंचवडमध्ये निवडणूक बिनविरोध होईल का, अशी चर्चा होते आहे.
 
लक्ष्मण जगताप यांच्या मागे त्यांती पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या जगताप आणि भाऊ शंकर आणि विजय जगताप असा परिवार आहे. पोटनिवडणुकीसाठी जगताप यांच्या कुटूंबातील सदस्यांपैकी उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो.
 
पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हे अजून निश्चित झालेलं नसलं तरीही जर लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबियांपैकी कुणाला उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते.
 
"लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अजून तसा कुठला प्रस्ताव दिलेला नाही. एकंदरित असं वाटतं की, लक्ष्मण भाऊंचा प्रभाव असलेला तो मतदारसंघ आहे. लक्ष्मणभाऊंच्या विचारांचा किंवा त्यांच्या कुटुंबातला उमेदवार असला तर ती निवडणूक बिनविरोध होऊ शकते."
 
"लक्ष्मण जगताप यांनी विकासाच्या मुद्द्यावर कधी कुणाला अडवलं नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सगळ्या नेत्यांना जोडून काम केलं. त्यामुळे सगळे नेते सहानुभूतीने विचार करतील. भाजपमध्ये सध्या बाकी कुणी इच्छूक नाही. ही सगळी वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल," असं महेश लांडगे यांनी सांगितलं.
 
भाजपसाठी या दोन्ही निवडणुका होणं महत्त्वाचं आहे का?
"बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चिंचवडमध्ये अडचणी कमी असतील. कारण चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचा बेस होता. त्यांच्या कुटूंबातले सदस्य, निवडणुकांमध्ये जरी नाहीत, तरीही लोकांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत. तिथे लक्ष्मण जगताप यांच्या नावाचाही करिष्मा आहे. कसब्यात भाजप पक्षाचा करिष्मा आहे. त्यामुळे दोन्हीकडचे निर्णय वेगवेगळे असू शकतात. एका ठिकाणी कुटुंबातला सदस्य देऊन निवडणूक बिनविरोध करणं आणि कसब्यासारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडे वळून तिथे निवडणूक होऊ देणं.
 
बिनविरोध झालीच पाहिजे यासाठी भाजप फार आग्रह धरेल असं वाटत नाही. निवडणूक समजा झाली आणि भाजप जिंकलं तर ते दाखवण्यासाठी भाजपकडे एक मोठी गोष्ट राहते. समजा निवडणुकीचा निकाल काही वेगळा लागला तर भाजप पुर्णपणाने यंत्रणा बदलेल," असं सम्राट फडणीस यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हे अजून निश्चित झालेलं नसलं तरिही जर लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबियांपैकी कुणाला उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. "लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबियांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अजून तसा कुठला प्रस्ताव दिलेला नाही. एकंदरित असं वाटतं की, लक्ष्मण भाऊंचा प्रभाव असलेला तो मतदारसंघ आहे. लक्ष्मणभाऊंच्या विचारांचा किंवा त्यांच्या कुटूंबातला उमेदवार असला तर ती निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
 
लक्ष्मण जगताप यांनी विकासाच्या मुद्द्यावर कधी कुणाला अडवलं नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सगळ्या नेत्यांना जोडून काम केलं. त्यामुळे सगळे नेते सहानुभूतीने विचार करतील. भाजपमध्ये सध्या बाकी कुणी इच्छूक नाही. ही सगळी वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल," असं महेश लांडगे यांनी सांगितलं.
 
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?
निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
 
तर 7 फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 फेब्रुवारी हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होईल. यानंतर 2 मार्चला निकाल जाहीर करण्यात येईल.
 
यामुळे येत्या काही दिवसांतच राजकीय घडामोडींना वेग येऊन दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता आहे. तोपर्यंत राजकीय गणिते कशी बदलतात हे बघणंही औत्सुक्याचं ठरेल.
 
Published By- Priya Dixit