1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:15 IST)

सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह पाच जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

सुनेचा कौटुंबिक छळ, मारहाण, दमदाठी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेच्या तक्रारीनुसार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत सुनेने अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
याप्रकरणी 35 वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कुशाग्र कदम, सासू मंगला कदम, सासरे अशोक कदम, दीर गौरव कदम, जाऊ स्वाती कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 498 अ, 417, 323, 500, 504, 506, 120 ब, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि कुशाग्र या दोघांचा विवाह 29 मे 2011 रोजी विवाह झाला. लग्न आणि रिसेप्शनसाठी फिर्यादी यांच्या वडिलांनी 50 लाख रुपये खर्च केला. लग्नाच्या काही वर्षानंतर पतीला लग्नापूर्वीपासून गंभीर आजार असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. ही बाब आरोपींनी फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली. उलट डॉक्टर सोबत संगनमत करून फिर्यादी यांना आजार असल्याचे सांगितले.
 
फिर्यादी यांना कृत्रिमरीत्या (आयव्हीएफ) गर्भधारणा करण्यास लावले.
पती कुशाग्र यांना दारु पिण्याचे, जुगार खेळण्याची सवय होती. ते पार्टीला जात. घरी रात्री उशीरा येत असत. त्याबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी करत होते. सर्वजण मिळून त्रास देत होते. जाऊ सासूला भडकावून फिर्यादीच्या विरोधात कटकारस्थान करत. पतीचे अनेक महिलांसोबत संबंध होते. महिलांशी टिंडर अॅप, एस्कर्ट सर्विसेस, तृतीयपंथी लोकांशी पती संबंध ठेवत होते, असे मार्च 2020 मध्ये फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करुन पतीने त्यांना हाताने मारहाण केली.
 
लॉकडाऊनच्या काळात पती आणि सासूने छोट्या छोट्या कारणावरून फिर्यादी यांना त्रास दिला. 25 जुलै 2020 रोजी फिर्यादी मुलासोबत कायमची माहेरी आल्या. आरोपींनी ड्रायव्हर कडून फिर्यादीवर पाळत ठेवली. ‘नांदायला न आल्यास तुझ्या जीवाचे बरे वाईट करू. तुझ्यावर ऍसिड टाकायला लावू. तुझी गावात बदनामी करू’, अशी फिर्यादी यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.