सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:32 IST)

पुण्यातील चित्रपटांसंबंधी काम करणाऱ्या चार संस्थांचे विलिनीकरण

पुण्यातील चित्रपटांसंबंधी काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या चार संस्थांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विलिनीकरणाला मान्यता दिली. पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) तसेच फिल्म डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या चार संस्थांचे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये (एनएफडीसी) विलीनीकरण होणार आहे. या चार संस्थाही यापुढील काळात एनएफडीसीअंतर्गत काम करणार असल्याने पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कदाचित स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही.
 
पाच संस्थांनी एकाचप्रकारचे काम करून उपक्रमाची नक्कल होण्याचा धोका टाळून खर्च वाचवण्याचा प्रयत्न होणार आहे. विलीनीकरणाच्या संदर्भातील प्रक्रियेसाठी तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. चारही संस्थांना यापुढे एकसारखे काम करता येणार नाही. एनएफडीसीकडून ठरवल्या जाणाऱ्या धोरणाप्रमाणे संस्थांना काम करावे लागेल. प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व यापुढे नसेल. एनएफडीसी या नावानेच सर्व संस्थांचे काम होईल.
 
फिल्म्स डिव्हिजनची स्थापना प्रामुख्याने सरकारी कार्यक्रमांना प्रसिद्धी आणि भारतीय सिनेमाच्या तपशीलासाठी माहितीपट तयार करण्यासाठी झाली. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या स्वायत्त संस्थेमार्फत लहान व किशोरवयीन मुला-मुलींना मूल्याधारित मनोरंजन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. चित्रपट संग्रहालयातर्फे भारतीय चित्रपटांचा वारसा जतन करणे तसेच समाजामध्ये चित्रपट संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे भारतीय चित्रपट महोत्सव आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण असे उपक्रम राबवले जातात.