सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (14:11 IST)

कोरोना व्हायरसचा नवीन झीटा व्हेरियंटबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्यायला हव्यात...

-अनंत प्रकाश
कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरियंट मिळाल्याचं पुण्यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने एका संशोधनात म्हटलंय. ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवशांच्या नाकातून आणि गळ्यातून घेण्यात आलेल्या स्वॉबमध्ये हा व्हेरियंट आढळल्याचं वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्री-प्रिंट (प्रकाशित होण्यापूर्वीच्या टप्प्यातले) संशोधन अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या BioRxiv मध्ये म्हटलं आहे.
 
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियापासून ते माध्यमांमधल्या वृत्तांमधून विविध शंका व्यक्त करण्यात येत आहेत. हा व्हेरियंट अतिशय भयानक असल्याचंही काही वृत्तांमध्ये म्हटलं होतं.
 
सोशल मीडियावर काही ठिकाणी या व्हेरियंटची तुलना डेल्टा व्हेरियंट्सची केली जातेय.
 
हा व्हेरियंट शोधणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या संशोधक डॉ. प्रज्ञा यादव यांच्याशी या नवीन व्हेरियंटशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसीने संपर्क साधला.
 
नवीन व्हेरियंट कुठून आला?
ब्राझील आणि ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांच्या गळ्यातून आणि नाकातून घेण्यात आलेल्या स्वॉबमधून हा व्हायरस मिळाल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने म्हटलंय.
 
डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, "कोरोना व्हायरसचा B.1.1.28.2 व्हेरियंट सगळ्यात आधी एप्रिल 2020 महिन्यात ब्राझीलमध्ये आढळला होता. हा एक महत्त्वाचा व्हेरियंट असल्याचं WHO ने म्हटलंय. हल्लीच या व्हेरियंटला 'झीटा व्हेरियंट' असं नाव देण्यात आलं."
 
"Sars CoV2 च्या जीनोमिक सर्व्हेलन्सनुसार ब्रिटन (डिसेंबर 2020) आणि ब्राझील (जानेवारी 2021) मधून भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवशांच्या नमुन्यांमध्ये व्हेरियंट B.1.1.28.2 आढळला होता. या दोन्ही प्रवशांना हा संसर्ग होण्याआधी कोणताही आजार नव्हता आणि संसर्ग झाल्यापासून ते संसर्गातून बरं होईपर्यंत त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत."
 
नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे?
कोरोना व्हायरसच्या इतर सगळ्या व्हेरियंट्सप्रमाणेच संशोधक या व्हेरियंटलाही महत्त्वाचा मानत आहेत. पण काही माध्यमांनी हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट इतकाच धोकादायक असल्याचं म्हटलंय.
 
या व्हेरियंटविषयीचे वैज्ञानिक पैलू सांगताना डॉ. यादव म्हणतात, " जेव्हा एखादा व्हेरियंट अनेक देशांमध्ये आढळतो, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना त्या व्हेरियंटला 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' श्रेणीमध्ये घालते. सोबतच हा व्हेरियंट मोठ्या लोकसंख्येमध्ये पसरून कम्युनिटी ट्रान्समिशनची परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता असते आणि त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते, तेव्हाच त्या व्हेरियंटला महत्त्वाच्या व्हेरियंट्सच्या यादीत घातलं जातं."
 
कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीजना हा व्हेरियंट चकवू शकतो, सोबतच mRNA प्रकारच्या लशींमुळे आपल्या शरीरात तयार होणाऱ्या सेराचाही या व्हेरियंटवर फारसा परिणाम होत नाही. काही लशी या व्हेरियंटवर पूर्णपणे प्रभावी ठरणार नसल्याचं संशोधकांचं मत आहे.
 
हा व्हेरियंट कसं नुकसान करू शकतो?
या व्हेरियंटचा 'सिरीयन हॅम्स्टर मॉडेल' पद्धतीने अभ्यास करण्यात आला. या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यावर वजन कमी होणं, श्वसन मार्गामध्ये या व्हायरसचा प्रसार होणं आणि फुफ्फुसांमध्ये गंभीर संसर्ग होण्याचा धोका असल्याचं या अभ्यासात आढळलं.
 
डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, "सिरीयन हॅम्स्टर मॉडेलच्या मदतीने आम्ही या व्हेरियंटचा अभ्यास केला. कोव्हिड -19 विषयी समजून घेण्याची ही एक प्रचलित पद्धत आहे. यामध्ये प्राण्यांवर याच्या चाचण्या केल्या जातात आणि याद्वारे व्हायरसच्या क्षमतेचा आणि त्यामध्ये साथ निर्माण करण्याची क्षमता किती आहे, याचा अंदाज याद्वारे घेतला जातो.
 
या व्हेरियंटमध्ये गंभीर साथ निर्माण करण्याची क्षमता असल्याचं आम्हाला या पद्धतीने केलेल्या अभ्यासात आढळलं."
 
कोणती लस प्रभावी ठरेल?
कोरोना व्हायरसचा एखादा व्हेरियंट आढळल्यानंतर त्यावर कोणती लस परिणामकारक ठरेल, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो.
 
कोव्हिड - 19 पासून संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लशींपैकी 'कोव्हॅक्सिन' लस या नवीन व्हेरियंटवर किती परिणामकारक ठरते, याचा अभ्यास करण्यात आला.
 
डॉ. प्रज्ञा म्हणतात, "कोव्हॅक्सिन या कोव्हिड 19वरच्या लशीमध्ये या व्हेरियंटपासून संरक्षण क्षमता असू शकते, असं आम्हाला अभ्यासात आढळलं. या लशीची निर्मिती करणाऱ्यांकडून या लशीमुळे नवीन व्हेरियंटचा धोका किती कमी होतो याविषयीची माहिती देण्यात आलेली नाही. पण ही लस घेतल्यानंतर या व्हेरियंटपासूनही संरक्षण मिळायला हवं."