प्रेमविवाह केल्याचा राग चाळीत राहणाऱ्या काही तरुणांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे- तरुणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून त्याच चाळीत राहणाऱ्या काही तरुणांनी या तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात 29 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जय अँथोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप आणि सोनू उर्फ रॅडो अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी येरवडा परिसरात एकाच भागात राहतात. काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणीने एका तरुणाची आळंदीत प्रेमविवाह केला होता. याचाच राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी या तरुणीला गाठत "तू साठ्याच्या पोराशी का लग्न केले, आता तुला सोडणार नाही" असे म्हणून हातातील धारदार हत्यार तिच्या डोक्यात मारण्यासाठी उगारले. परंतु फिर्यादीने हाताने वार अडवल्याने ती थोडक्यात बचावली.
Edited By- Ratnadeep Ranshoor