पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब : २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नाही
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. यानंतर मात्र, २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.
पुणे शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून अखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.