सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (14:10 IST)

नरेंद्र मोदी यांचं पुण्यातलं 'मंदिर' चार दिवसांतच का हटवण्यात आलं?

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर पुण्यातील औंध भागात उभारले होते. 15 ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा करण्यात आला होता.
 
अखेर पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने बुधवारी रात्री हे मंदिर हटविण्यात आले आहे.
 
मयुर मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे वीस वर्षांपासून काम करतात. मोदींनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी औंध भागात त्यांचे मंदिर उभारले होते. त्यात मोदींचा पुतळा ठेवण्यात आला होता.
 
खास जयपूर येथून मोदींचा संगमरवराचा पुतळा तयार करुन घेण्यात आला होता. यासाठी 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला होता. बाजूलाच एका बोर्डवर त्यांनी मोदींवर रचलेली कविता देखील लिहिण्यात आली होती.
 
मोदींचं भारतातील पहिलंच मंदिर असल्याचा दावा देखील ते करत होते. हे मंदिर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
 
मोदींचे मंदिर उभारल्याबाबत मुंडे यांच्यावर टीका सुद्धा करण्यात येत होती.
 
मोदींच मंदिर का उभारण्यात आलं होतं?
मोदींच मंदिर उभारणाऱ्या मयुर मुंडे यांच्याकडून बीबीसी मराठीने हे मंदिर उभारण्यामागील कारण जाणून घेतले होते.
 
त्यावेळी बोलताना मुंडे म्हणाले होते, ''मोदी यांची विकासकामे पाहून वाटले हा युगपुरुष आहे. अनेक वादाचे मुद्दे त्यांनी निकालात काढून न्याय दिला. असा माणूस परत मिळणार नाही. असं व्यक्तिमत्व आपण केवळ टिव्हीवर पाहतो.
 
ते आपल्या इथल्या नागरिकांना अनुभवता यावं यासाठी हा पुतळा आणि मंदिर उभारले. त्यांच्याबाबत एक कविता देखील लिहिली आहे. लोक येतायेत सेल्फी घेत आहेत.
माझी भक्ती मोदींप्रती आहे त्यामुळे बीजेपीच्या नेत्यांना देखील मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला बोलावलं नाही.''
 
कुठल्याही पदासाठी हे मंदिर उभारले नसल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले होते.
 
मंदिर उभारल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा
मंदिर उभारल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
 
बीबीसी मराठीने बुधवारी पुण्यातील भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना या मंदिराबाबत भाजपाच्या भूमिकेबाबत विचारले होते. परंतु त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
 
त्याचबरोबर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा याविषयी बोलण्यास नकार दिला होता.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंडे यांना हा पुतळा काढण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार मुंडे यांनी मोदींचा पुतळा मंदिरातून काढला असून मंदिर ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.
 
पुतळा काढल्याबाबत बीबीसी मराठीने मयुर मुंडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंडे यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.