मल्लाचा लाल मातीतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पुणे : पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात सरावासाठी आलेल्या मल्लाचा लाल मातीतच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास घडली. पैलवान स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे असे या मल्लाचे नाव आहे. तो 31 वर्षांचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. सपाटय़ा मारल्यानंतर व्यायाम करून नुकताच बसला होता. त्याला जागेवरचं हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला इतर पैलवानांनी पाहिले आणि रुग्णालयात दाखलही केले होते. मात्र, त्या अगोदरच त्याची प्राणज्योत मालवली.
स्वप्नीलने पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेतले होते. कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच तो महाराष्ट्र चॅम्पयिन देखील होता. सद्या तो सर्व पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. तसेच अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी जात होता. स्वप्नील हा एक युवा पैलवान म्हणून परिचित होता. तो मूळचा मुळशी तालुक्यातील महाळूंगे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पैलवान स्वप्नीलच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor