मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (09:31 IST)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने

BJP shivsena
येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कॉंग्रेसकडून इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
या उमेदवारांपैकी भाजपचे दोन आणि शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
 
संभाजीराजे छत्रपती यांनी आपण अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सर्व पक्षांनी आपल्याला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, नंतर संभाजीराजे शिवसेनेसोबत जाणार अशी शक्यता निर्माण झाली.
 
"माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली आहे. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं आहे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्या प्रमाणे करतील. मला हा देखील विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील," असं संभाजीराजेंनी म्हटलंही होतं.
 
मात्र, ऐनवेळेस शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींना या लढतीतून बाद करून कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपनेही तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडीक यांचं नाव जाहीर केलंय. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट आहे.
 
पण शिवसेना आणि भाजपसाठी ही चुरशीची लढत असेल. यात मतांचं गणित कसं असेल? घोडेबाजार होऊ शकतो का? सहाव्या जागेसाठीचं मतदान कसं असेल? या सगळ्याचा हा आढावा...
 
मतांचं गणित कसं असेल?
महाविकास आघाडी सरकारमध्ये अपक्षांसह 169 आमदार आहे. त्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 54, कॉंग्रेस 44, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 16 आमदार सरकारी पक्षांसोबत आहेत. राज्यातला विरोधी पक्ष असलेला भाजपकडे अपक्षांसह 113 आमदारांची संख्या आहे. भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1, आणि अपक्ष 5 असे 113 आमदार आहेत.
 
मतांच्या सूत्रानुसार विधानसभेची एकूण सदस्य संख्या म्हणजे 287 ( एका आमदाराचं निधन झाल्यामुळे 287 सदस्य आहेत.) जागांना रिक्त जागांच्या संख्येत अधिक 1 म्हणजे 7 यांचा भागाकार करून येणारी कोटा हा 41.1 आहे. यानुसार राजकीय पक्षांकडून मतांचा कोटा साधारण 42 धरला जाईल. त्यामुळे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 आमदारांच्या मतांची गरज असेल.
या मतांच्या सूत्रानुसार, भाजप - 113 मतांपैकी 84 मतांनी दोन खासदार सहजपणे निवडून येतील. त्यातून भाजपकडे 29 मतं शिल्लक राहतात. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 13 अधिक मतांची गरज आहे.
 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार दिल्यामुळे त्या दोन्ही जागा सहजपणे निवडून येऊ शकतील तर शिवसेनेचीही एक जागा सहजपणे निवडणूक येऊ शकते. तिसर्‍या जागेसाठी, शिवसेनेकडे 13 मतं शिल्लक राहतात, कॉंग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहतात. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 16 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे. ही सर्व मतं जरी शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराला मिळाली तरी त्याची संख्या 28 असेल. मग शिवसेनेला अधिक 14 मतांची गरज असेल.
 
पण साधारणपणे अशा निवडणूकांमध्ये आमदारांची मतं बाद होणं किंवा इतर कारणांमुळे कोटा पूर्ण न होणं ही भीती असते म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कोट्यापेक्षा काही मतं जास्त देण्यावर पक्षाचा भर असतो. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिकची किती मतं शिवसेनेला देऊ शकतील याबाबत निर्णय घेतला जाईल. भाजपमध्येही दोन सहजपणे निवडणूक येणाऱ्या उमेदवारांना काही अधिकची मतं देऊन सुरक्षित केलं जाण्याची शक्यता आहे. मग तिसर्‍या उमेदवारासाठीचा विचार केला जाईल. त्यामुळे एकंदरीत सहावी जागा निवडून आणणं हे शिवसना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी कठीण आणि चुरशीचं असेल.
 
घोडेबाजार होण्याची शक्यता?
राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षांना मतं दाखवावी लागतात. त्यामुळे सर्व आमदारांना 'व्हिप' (whip) लागू केला जातो. याचा अर्थ सर्व आमदारांना पक्षाचा आदेश पाळणं अनिवार्य असतं. अन्यथा त्या सदस्यावर पक्षाकडून कारवाई केली जाऊ शकते. परंतु अपक्ष आमदारांना हा 'व्हिप' लागू होत नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचं महत्व या निवडणुकीत अधिक वाढलं आहे. ही मतं खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान याबाबत विश्लेषण करताना सांगतात, "शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून सहावा उमेदवार दिल्यामुळे आता मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे. त्यामुळे अपक्ष आणि इतर लहान पक्षांची मतं खेचण्यासाठी मोठा घोडेबाजार होऊ शकतो. 2010 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 3 उमेदवार निवडून येणार होते. पण इतर पक्षांची मतं फोडून कॉंग्रेसने चौथा उमेदवार निवडून आणला होता. तेव्हाही घोडेबाजार झाला होता. तसंच काहीसं चित्र या निवडणूकीत बघायला मिळू शकतं. "
 
घोडेबाजार केला तर ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने दिलेल्या तिसर्‍या उमेदवाराविषयी बोलताना म्हटलं,"आमच्याकडे मॅजिक फिगर आहे. आम्ही सहावी जागा लढून जिंकून आणू शकतो. " भाजपला सहावी जागा निवडून येण्याबाबत विश्वास आहे. पण ईडी, सीबीआयचा वापर करून हा विश्वास भाजपमध्ये निर्माण होऊ शकतो? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे.
 
भाजपने तिसरा उमेदवार देऊन शिवसेनेला दिलेल्या आव्हानाबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "आमच्यासमोर कोणतंही आव्हान नाही. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. मला माहिती नाही या निवडणूकीत ईडी आणि सीबीआय मतदान करू शकतं का? तशी व्यवस्था करून त्यातून ते संख्याबळ निर्माण करत असतील. पण यात कोणीही घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये. जसं तुमचं केंद्राकडून महाराष्ट्रावर लक्ष असतं तसं महाराष्ट्राच्या गृहविभागाचं आणि मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे."