1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

किशोर दर्डा यांना अटक

यवतमाळ- यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांकडून 17 मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षण संस्थेचा सचिव किशोर दर्डा याला आज पहाटे नागपुरात अटक  करण्यात आली. त्याला दुपारी कडेकोट बंदोबस्तात यवतमाळ जिल्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, त्या मुली मला मुलीसारख्या आहेत. अशा गोष्टीवर पांघरुण घालण्याचा विचार एका पित्याच्या मनात कसा येईल, असे निवेदन विजय दर्डा यांनी केले आहे.
 
 
अटकेची कुणकुण लागताच यवतमाळ पब्लिक स्कूलचा सचिव किशोर दर्डा पसार झाला. नागरिकांचा आणि पालकांचा रोष पाहता पोलिसांनी किशोर दर्डाच्या अटकेसाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली. किशोर दर्डाशी जवळीक असलेल्या व्यक्तींच्या घराची झडती घेऊन त्याचा शोध घेण्यात येत होता. सरतेशेवटी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याला नागपुरात सोनेगाव परिसरात अटक करण्यात आली.
 
सकाळी 11च्या सुमारास किशोर दर्डाला अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाले.कडेकोट बंदोबस्तात दुपारी तीनच्या सुमारास किशोर आणि अन्य आरोपींना न्यायालयात नेण्यात आले. किशोरला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली, तर अन्य आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
 
आज यवतमाळ शहरात दिवसभर पावसाची संततधार होती. त्यातच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे आंदोलक किशोर दर्डापर्यंत पोहोचू शकले नाहीत. असे असले तरी तीव्र जनभावना लक्षात घेता पुढील काही दिवस किशोरला जामीन न घेता पोलिस बंदोबस्तातच ठेवले जाईल, असे संकेत वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिले.