भुजबळ यांना जामीन मंजूर, पण मुक्काम कारागृहातच
मुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना येथील ग्रंथालय भूखंड घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, आर्थिक गैरव्यवहारांबाबत पीएमएलए कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात आधीच जामीन नाकारलेला असल्याने भुजबळांना तूर्त आर्थर रोड कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा, बेहिशेबी मालमत्ता, कलिना येथील राज्य ग्रंथालयाच्या भूखंडाचे प्रकरण यांमुळे भुजबळ गोत्यात आले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 14 मार्च रोजी तब्बल 11 तास भुजबळांची मॅरेथॉन चौकशी करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून भुजबळ यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहातच आहे.
भुजबळ यांनी प्रकृतीचे कारण देऊन वारंवार जामिनासाठी प्रयत्न केले मात्र, कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली नाही. या पाश्र्वभूमीवर आज मात्र भुजबळ यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसीबीच्या विशेष न्यायालयात भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना महाराष्ट्र सदन घोटाळा व कलिना भूखंड प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही याच प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.