रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (17:36 IST)

मालाड येथे आपकॉन आयुर्वेदीय संवाद संपन्न

मुंबई - आयुर्वेद हा भारतीयांच्या नसानसांत आहे आणि आयुर्वेद हे स्वास्थ्यरक्षणाचे शास्त्र प्राचीन काळी ऋषिमुनींनी वेदवाङ्‌मयाबरोबरच निर्माण केलेले आहे. म्हणूनच अशा आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स ह्या संस्थेच्या वतीने मालाड (पश्चिम) च्या एस्पी ऑडीटोरियम येथे आपकॉन आयुर्वेदीय संवाद २०१६ याचे आयोजन केले होते. डॉ. निलेश दोषी आणि डॉ. दिलीप त्रिवेदी यांच्या कुशल नेतृत्व खाली हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या संवादाला देशभरातून आयुर्वेद क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ.गोपकुमार, डॉ. एल महादेवन, डॉ. मिताली मुखर्जी, डॉ. निगम, डॉ. राजेंद्र राणावत, डॉ. रमेश शर्मा, डॉ. निलेश दोषी आणि डॉ. दिलीप त्रिवेदी ह्या तज्ज्ञ वैद्यांनी आयुर्वेदातील विविध विषयावर चर्चा करून उपस्थित वैद्यांना मार्गदर्शन केले. 

आयुर्वेदाचा आरोग्याशी संबंध असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने उपचार घेण्यासंदर्भात 'कॉशसली' विचार केला जातो. शिवाय आयुर्वेदाचा आयुष्यात शिरकाव करून घ्यायचा म्हणजे तुमचा संपूर्ण, अगदी १००% सहभाग अपेक्षित असतो. एक गोळी एक ग्लास पाण्यासोबत घेतली की काम झालं असं नाही. पथ्य पाळणं, योगासनं करणं, पंचकर्मासारखे विधी करणं हे सगळे सोपस्कार करावे लागतात. त्यामुळे कदाचित लोकांकडून उत्साह दाखवला जात नाही. म्हणूनच बदलत्या जीवनशैलीमुळे बदललेला आहार-विहार व त्यामुळे होणारे थॉयरॉईड, मधुमेह, मेदोरोग, इत्यादी नाना प्रकारचे रोग यावर डॉ.गोपकुमार यांनी त्यांच्या सहज शैलीत मार्गदर्शन केले. डॉ. महादेवन यांनी व्याधीतील दोषांच्या गुणांचे प्राबल्य ओळखून त्यानुसार औषध योजना कशी करावी याची माहिती दिली तसेच आयुर्वेदिक पद्धतीने प्रत्येक व्याधी बरा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. डॉ.मिताली मुखर्जी यांनी त्याच्या व्याख्यानातून आयुर्जिनोमिक्स ह्या नवीन संकल्पनेची ओळख करून दिली. सामान्य वैद्याला त्याच्या दवाखान्यामध्ये सहज पंचकर्म कसे करता येईल ह्या विषयी मार्गदर्शन डॉ.निगम यांनी केले.
सध्या भेडसावत असलेल्या त्वचारोगांच्या उपचाराविषयी डॉ. दिलीप त्रिवेदी यांनी व्याख्यान दिले. डॉ. निलेश दोषी यांनी गुदमार्गाच्या रोगाविषयी माहिती दिली. तर आयुर्वेद उपचार पद्धतीने डायबेटिक फूट हा असाध्य व्याधी बरा करता येतो हे सांगितले. अशा प्रकारे आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणारा आपकॉन २०१६ हा परिसंवाद उत्कृष्टरित्या संपन्न झाला. 

ह्या परिसंवादात मुंबई शहर व राज्यातील ५०० हुन अधिक वैद्यगण सहभागी झाले होते. ह्या परिसंवादाचे नियोजन डॉ. योगेश धामणे आणि डॉ. संजय वाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या केले. एकूणच आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे. हे वैदिक ज्ञान गंगेसारखं पवित्र आहे. ५००० वर्ष जिवंत असणं आणि २१व्या शतकातसुद्धा वापरलं जाणं यापेक्षा आणखी पुरावा काय हवा? म्हणूनच नवीन वैद्यांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवावा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असे ह्या कार्यक्रमातून फलित झाले.