शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (11:50 IST)

पैशासाठी मृतदेहावर 2 दिवस केले उपचार, डॉक्टरला अटक

सांगलीत एका धक्कादायक प्रकरणात मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर तब्बल 2 दिवस उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. 
 
या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करुन विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.
 
नेमकं काय घडलं?
आधार हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. फेब्रुवारी महिन्यात तक्रारदाराच्या 60 वर्षीय आईला उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. योगेश वाठारकरने तिच्यावर उपचार केले. नॉन कोव्हिड उपचारादरम्यान मार्च महिन्यात महिलेचा मृत्यू झाला. मात्र ही माहिती डॉक्टरांनी त्यांच्या मुलापासून लपवून ठेवली आणि मृतदेहावर उपचार सुरु ठेवले, असा आरोप केला जात आहे.
 
24 फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांच्यावर नॉन कोविड उपचारादरम्यान 8 मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले.
 
दोन दिवसांनी अर्थात 10 मार्चला डॉ. वाठारकरने नातेवाईकांना बोलावून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 रुपयांचे ज्यादा बिल बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअरमध्ये उपचारादरम्यान 8 मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे.  मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू 8 मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र डॉक्टरांनी मृतदेह 10 मार्चला ताब्यात दिला.
 
दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली आहे.