रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (07:49 IST)

शिवालीक ग्रुपच्या मालकीची ८१ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून कारवाईचा सपाटा सुरुच आहे. ईडीने मुंबईतील शिवालीक ग्रुपच्या मालकीची ८१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये १०१ जमिनीचे तुकडे आणि एका हेलिकॉप्टरचा समावेश आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी युनिटेक कंपनीच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे.
 
ईडीकडून युनिटेक कंपनीच्या अनियमितपणे व्यवहाराचा तपास सुरु आहे. युनिटेक कंपनीने शिवालीक ग्रुपसह वेगवेगळ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजेच ५७४ कोटी रुपये दिले होते. मात्र, ते पैसे का दिले? इतकी मालमत्ता कुठून आणली? या संबंधित अनेक प्रश्नांचा खुलासा होत नव्हता. दरम्यान, युनिटेकने दिलेल्या पैशांमधून शिवालीक ग्रुपने जमीन आणि हेलिकॉप्टर विकत घेतल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासातून मिळाली. अखेर ईडीने याप्रकरणी कारवाई करत शिवालीक ग्रुपची ८१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
 
युनिटेक कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणी तपास करत असताना कंपनीने अनेक व्यवहार अनियमीत केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ४ मार्च रोजी देशात आणि मुंबईत मिळून सुमारे 35 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या चौकशीत युनिटेक कंपनीने शिवालीक, ट्रिकर ग्रुप आणि इतर काही कंपन्यांमध्ये पैसे फिरवल्याच उघडकीस आलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेकांच्या चौकशा केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ट्रिकर ग्रुपची ३५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर आज शिवालीक ग्रुपची ८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी युनिटेक प्रकरणात आता पर्यंत ४३१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.