सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (09:11 IST)

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली असून आज (31 जानेवारी) 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांचा आदेश जारी केला असून त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची बदली मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.
 
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन वस्तू आणि सेवा कर विभागाच्या विशेष आयुक्तपदी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी तर अमोल येडगे यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती  संभाजीनगर आणि अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवश्यंत पांडा  यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून बदली करण्यात आली आहे.
 
अहेरी उपविभागाचे  सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे तर डहाणू उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी संजीता महापात्रा यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तळोदा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नतिशा माथूर यांची प्रकल्प अधिकारी तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नेमणूक झाली आहे.