सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (13:40 IST)

'कार हळू चालव' म्हटल्याचा राग, मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

औरंगाबाद: अगदी किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. रागाच्या भरात साध्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं हत्येची घटना घडली.
 
घराशेजारून भरधाव वेगाने जाणाऱ्या एकाने कार काढल्यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने 'कार हळू चालव' अशी चालकाला समजूत दिली. याचा राग मनात धरुन नंतर संबंधित कारचालक व त्याच्या भावांनी हल्ला करुन मारहाण करीत सदर व्यक्तीचा खून केला. ही घटना अजिंठ्यात गुरुवारी मध्यरात्री घडली. 
 
मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान (५०) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद (वय-28), शेख जावेदजान मोहंमद शेख (वय-32) आणि शेख अथर जाफर बेग (वय-38) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
 
आरोपी सादीक हा गुरुवारी मध्यरात्री आपल्या कारने वेगाने जात होता. दरम्यान त्याची कार मोहंमद रेहमान यांच्या घरासमोरून गेली. यात मोहंमद रेहमान यांना सादीकच्या कारचा कट बसला. भरधाव वेगाने कार बाजूने निघून गेल्याने मोहंमद रेहमान घाबरले. त्यांनी सादीकला ‘कार हळू चालव’ अशी समज दिली. यावर सादिकचा राग अनावर झाला आणि त्याने कार थांबवून रेहमान यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. रस्त्यावरच भांडणं सुरू झाल्यानंतर तिथे जमलेल्या आजू-बाजूच्या लोकांनी त्यांच्यातील वाद मिटवला. त्यानंतर सादिक घटनास्थळावरून निघून गेला. 
 
पण आरोपी सादिकने संबंधित घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सादीकचे नातेवाईक शेख जावेदखान, मोहंमद शेख आणि अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी पोहोचले. रागाच्या भरात त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. यात मोहम्मद रेहमान रक्तबंबाळ झाले. मोहम्मद रेहमान यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद इथं उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शहरात नेत असताना, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला
 
याप्रकरणी, अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद, शेख जावेदजान मोहंमद शेख,आणि शेख अथर जाफर बेग अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. अजिंठा पोलिस पुढील तपास करत आहेत.