बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (14:52 IST)

राज्यातील सध्याची स्थितीवर हायकोर्टाचे ताशेरे सरकारवर नाराज

राज्यात मराठा आंदोलन सध्या सुरु आहे. यामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या तीव्र आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले होते. या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची, खाजगी वाहनांची जाळपोळ झाली आहे. तर आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक बनली असल्याचे सांगितले आहे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
 
आज मुंबई हायकोर्टात दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाची सुनावणी सुरू होती. त्यादरम्यान, न्यायमूर्तींनी हे मत नोंदवले. राज्यातील सध्याचे चित्र विदारक आहे. दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे परिस्थिती स्फोटक बनली असून, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा तपास हा आतापर्यंत निष्काळजीपणे केला गेला असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासामधून काहीतरी शिका असा सल्ला देत हायकोर्टाने एसआयटी आणि सीबीआयने पाठवलेला तपासाचा प्रगती अहवाल न उघताच परत पाठवला आहे. त्यामुळे सरकार अनेक बाजूनी अपयशी ठरले असे दिसते आहे.