बच्चू कडू VSअमोल मिटकरी
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेत एण्ट्री घेतल्यामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धक्का बसला आहे. अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार पक्षाचे उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे यांनी विजय मिळवला आहे. अमोल मिटकरी यांच्या गावातच त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रहार पक्षाने अकोला जिल्हा परिषदेत आतापर्यंत एकही जागा जिंकली नव्हती. मात्र आता एक जागा जिंकून प्रहाने एण्ट्री घेतली आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा मिळाल्या.
बच्चू कडू विरुद्ध अमोल मिटकरी
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कालच मंत्री बच्चू कडू यांची तक्रार केली होती. “शिवसेनेच्या (Shiv Sena) पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं.