अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
मोदी सरकार 2.0 चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच, आता आमदार बच्चू कडू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून एक मोठं विधान केलं आहे. अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू म्हणाले, अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांना या सरकाचा आरसा असतो, ते तुम्ही द्या. अर्थसंकल्पीय भाषणाचे अनेक किस्से असेच आहेत, की भाषण खूप मोठं असतं परंतु कृतीमध्ये किती येतं, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून यामध्ये काही समाधानकारक गोष्टी आहेत. अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे, असं मी म्हणेण पण यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याचा भाग सुटलेला आहे. बेघरांच्या घरांचा भाग सुटलेला आहे. मजुरांचा भाग सुटलेला आहे. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी फार अशी तरतूद दिसत नाही.
याचबरोबर, सगळ्यात मोठी दु:खाची गोष्ट अशी आहे, की अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला आहे. कुसुमाग्रज म्हणत होते भाषा मरते आणि त्यासोबतच देशही मरत असतो. या देशाची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे आणि लोहिया असे म्हणायचे की, ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या भाषेत तुम्ही सभागृहात बोललं पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला ते समजेल. म्हणून पंतप्रधान मोदींना आम्ही पत्र लिहिणार आहोत की पुढील वर्षीचं बजेट हे हिंदीमधून आलं पाहिजे. कारण, आपण या देशाच्या संस्कृतीचे पुरस्करते आहोत. असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
Edited By-Ratnadeep Ranshoor