मंगळवार, 29 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अथिती देव भव नाही अतिथी मार खा, पुण्यात मुजोर तरुणांची पर्यटकांना बेदम मारहाण

आपला देश जगात अतिथी देव भव असे ब्रीद घेवून परदेशी पर्यटकांना देशात बोलावतो, मात्र आपले नागरिक या ब्रीदाला काळीमा फासताना दिसत आहेत. असाच संतापजनक प्रकार पुणे येथे घडला आहे. पुण्यात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांना तरुणांनी मारहाण करून त्यांच्या कारच्या  काचा भल्या मोठा दगडांनी  फोडल्याचा प्रकार सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे  घडला आहे.

हे परदेशी नागरिक एका किराणा दुकाना खरेदी करण्यासाठी आले असताना दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांनी धक्काबुक्की करून कारची तोडफोड केली. मोहम्मद  हुसेन (वय-२७) आणि मोहम्मद  अबाद (वय-२८) असे मारहाण  करण्यात आलेल्या इराणी पर्यटकांची नावे आहेत.

हुसेन आणि अबाद हे दोघे मुंबई येथून एका टुरिस्ट कंपनीमार्फत कार चालकासह पुण्यामध्ये आले होते. माणिकबाग परिसरात आल्यानंतर कार चालक आणि त्यांच्यासोबत आलेला गाईड खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात गेले. त्यावेळी चालक आणि दुकानदार यांच्यात वाद सुरु झाले. हा वाद सुरु होता त्यावेळी हुसेन आणि अबाद हे दोघे गाडीमध्ये होते.त्यांचा वाद सुरु असताना दोघा पर्य़टकांनी स्वत: गाडी चालवत तेथून निघून गेले.

दरम्यान, किराणा दुकानात असलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या कारच्या काचांची तोडफोड केली. तर दुकानदराबरोबर वाद घालणारे चालक आणि गाईड हे दोघे तेथून पसार झाले. पर्यटकांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांनी तीन दिवसांनी मायदेशी परत जायचे असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे समजतेय. त्यामुळे या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकारचा व्हिडियो बघ्या नागरिकांनी काढला आहे. तो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. या मुळे आपल्या देशाची बदनामी होणार हे नक्की.