शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (11:48 IST)

छ. संभाजीनगर: आदर्श पतसंस्थेची प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देणार- एकनाथ शिंदे

छ. संभाजीनगर- आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. डीडीआर ऑफिससमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचेही पाहायला मिळाले. याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी आदर्श पतसंस्थेमधील घोटाळ्याबाबत भाष्य केले.

आदर्श पतसंस्थेची सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, असे ते म्हणाले.
 
खासदार जलील मला भेटले होते. आदर्श पतसंस्था प्रकरणी जो भ्रष्टाचार झाला आहे. लोकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये आदर्श पतसंस्थेच्या सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊ आणि लोकांचे सगळे पैसे परत करू, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे.
 
आज मंत्रिमंडळाची बैठक छ. संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले. हजारोंच्या संख्येने ठेवीदार आंदोलन करत होते. मंत्र्यांनी येऊन ठेवीदारांना भेटावे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

Edited By - Ratnadeep Ranshoor