पत्नीऐवजी दुसरी महिला उभी करून न्यायालयाची फसवणूक
नाशिक : लोकअदालतीत सुरू असलेल्या दाव्यात पत्नीऐवजी दुसर्या महिलेला उभे करून खोटी सही करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रूपाली राहुल सानप ऊर्फ रूपाली सुधाकर नागरे (वय 35, रा. रविराज एम्पायर, टाकळी-तपोवन लिंक रोड, नाशिक) व संशयित राहुल दत्तू सानप यांच्यात न्यायालयीन दावा सुरू आहे. दरम्यान, दि. 7 मे 2022 रोजी नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात लोकअदालत सुरू होती. त्यावेळी फिर्यादी रूपाली सानप यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या दाव्यात आरोपी राहुल सानप यांनी रूपाली यांच्याऐवजी कोणी तरी अज्ञात महिला न्यायालयासमोर उभी केली, तसेच फिर्यादी रूपाली सानप यांची खोटी सही करून कागदपत्रे सुपूर्द केली.
राहुल सानप यांनी पत्नीऐवजी दुसरी महिला उभी करून न्यायालयाची फसवणूक केल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी रूपाली सानप यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, राहुल सानप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor