गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (07:47 IST)

‘शासन आपल्या दारी’साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

eknath shinde
मुंबई, : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे.
 
सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत  यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आतापर्यंत सातारा, कन्नड -औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड – पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यांचा दौरा केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून गरजूंना योजनांबरोबरच विविध दाखले देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना शासनाच्या इतरही योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे. यातून योजनांची लोकाभिमुखता, पारदर्शकता वाढली आहे.
 
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून ६ लाख ९७ हजार नागरिकांना विविध योजनांचे लाभ तसेच दाखले दिले आहेत. राज्यात सर्वात जास्त लाभ गडचिरोली जिल्ह्याने वितरित केल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली आहे. या जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी होणार आहेत. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हजारो लाभार्थ्यांना योजनांचे लाभही वितरीत करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 
नागरिकांना विविध शासकीय दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नाव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळ्या ३३ योजना, सेवांचा लाभ गडचिरोली जिल्ह्यात दिला जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतून अशा योजना, सेवांसाठीच्या कागदपत्रांचीही एकाच छताखाली पूर्तता करून दिली जात आहे.