माझ्या वक्तव्याचा विपर्यास, कपोलकल्पित कहाण्या रचून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव!  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल; पवारांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देणार नाही
	 
	नागपूर: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर पटोले यांनी आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कपोलकल्पित कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा डाव सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला.
				  													
						
																							
									  
	 
	नाना पटोले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा कसा विपर्यास झाला आणि आपण नेमकं काय बोललो याचा खुलासा केला. कपोलकल्पित कहाण्या रचण्याचं काम सुरू आहे. मी परवा पुण्यात होतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचं कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारडेही जात असतो. सर्व घडामोडींची माहिती केंद्र आणि राज्याकडे जात असते. सरकारकडे रोज प्रत्येक विभागाची, जिल्ह्याची माहिती जात असते. माझीच नाही तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचीही माहिती जात असते. ही प्रोसिजर मी कार्यकर्त्यांना सांगत होतो. ही भूमिका मी मांडली. त्याचा विपर्यास केला गेला
				  				  
	 
	आमचा विरोध भाजपला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी आमची दुश्मनी नाही. हे सरकार पाच वर्षे चालेल. आमच्यात मतभेद नाहीत. भाजपचा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच या कपोलकल्पित कहाण्या रचल्या जात आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच या कहाण्या रचल्या जात आहेत, असं सांगतानाच सरकारमध्ये कोणतीही गडबड नाही. आम्ही एकत्र मिळून काम करत आहोत. आघाडीत नाराजी नाही. आमचं सरकार व्यवस्थित सुरू असून आमचं सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	पटोले त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरं भरलं आहे, असं फडणवीस म्हणत आहेत. तर मग त्यांचं सरकार असताना माझे फोन टेप केले गेले? ते काय होतं? त्यावेळी तुम्हालाही माझी भीती वाटली होती का?, असा सवाल त्यांनी केला.
				  																								
											
									  
	 
	तुमच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का?, असा सवाल पटोले यांना करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं तर त्यांना भेटायला जाईन. मी काही चुकीचं बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
				  																	
									  
	 
	पवारांच्या प्रतिक्रियेवर उत्तर नाही
	शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय मी घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.