शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (15:31 IST)

माझ्या बोलण्याचा विपर्यास, महिलांचा अवमान करणे माझा स्वभाव नाही : आशिष शेलार

मुंबई : मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन, असं सांगतानाच महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.
 
आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच, असं शेलार म्हणाले. माझ्या २५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो खोट्या कुटनीतीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेकवर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना मला आहे, असंही त्यांनी सांगितलं. अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की , मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो. हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही, असं शेलार म्हणाले.
 
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला म्हणून विधानसभेतून निलंबित केले गेले. महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वरळीतील चिमुरड्याच्या मृत्यूचा जाब सत्ताधीशांच्या विचारला, कोस्टल रोड मधील भ्रष्टाचार उघड केला. ममतादिदीं सोबतच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा अजेंडा उघड केला म्हणून आता असे खोटे गुन्हे दाखल करुन जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर मग यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल तर मग तो शंभरवेळा आम्ही करू, असा इशाराही त्यांनी दिला.