गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (13:03 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १७ विधेयके संमत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांमार्फत दोन्ही सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, प्रस्ताव, मागण्यांवर समर्पक चर्चा करण्यात आली. तसेच या अधिवेशनात एकूण 17 विधेयके संमत करण्यात आली असून सर्व विधेयके सविस्तर चर्चा करून शांततेत संमत करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 संस्थगित झालेल्यात्यानंतर विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, या अधिवेशनात शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ते सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी 31 मार्चपर्यंत सर्व संबंधित विभागांना देण्यात येईल. यापैकी ऊर्जा विभागासाठी तरतूद केलेला बहुतेक सर्व निधी वितरीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत झाले असल्याने शासनाची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू होण्याचे आवाहन
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना श्री.पवार म्हणाले, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या आणि इतर राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापर्यंत जाणारे वेतन देण्यात येत आहे. यामुळे राज्यावर सुमारे 700 कोटींचा बोजा पडणार असून वेतनावर एकूण 4 हजार 500 कोटी रूपये खर्च होणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व वेळेत अदा करण्यात येणार असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. महामंडळासाठी येत्या काळात तीन हजार बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यातील एक हजार सीएनजी तर दोन हजार इलेक्ट्रिक बस असतील. राज्यात पाच हजार चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून प्रत्येक एसटी आगारात एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहन श्री.पवार यांनी यावेळी केले.